मुंबई : भारतीय प्रवासी लवकरच कमी किमतीत हवाई प्रवास करु शकणार आहेत. दुबईमधील (Dubai) दोन व्यावसायिकांद्वारे नवी एअरलाइन (Airline) सुरु करण्यात आली आहे. सध्या परदेशात असणाऱ्या या विमानसेवेला सरकारकडून मंजूरी मिळाल्यानंतर पुढील वर्षातच ही विमानसेवा सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच भारतातही दाखल होणार असल्याचे कंपनीच्या संस्थापकांनी सांगितले. त्यामुळे हवाई प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘एअर केरळ’ (Air Kerala) असे नव्या विमानसेवेचे नाव असून या एअरलाइनच्या सुरुवातीला तीन एटीआर ७२- ६०० विमाने वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर ही एअरलाइन देशातील श्रेणी २ आणि श्रेणी ३ सारख्या छोट्या शहरांना जोडण्यात येणार आहे. सध्या जेटफ्लाय एव्हिएशन या नावाने नोंदणीकृत विमान कंपनीला हवाई वाहतूक सेवा चालवण्यास ३ वर्षांची मान्यता देण्यात आली आहे, असे कंपनीने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
दोन उद्योगपतींचा पाठिंबा
एअर केरळ ही विमानसेवा भारताच्या दक्षिण भागातील पहिली प्रादेशिक विमानसेवा असणार आहे. केरळ सरकारने २००५ साली पहिल्यांदा या विमान कंपनीची योजना आखली होती. त्यानंतर तब्बल १९ वर्षानंतर ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी दुबईतील अफी अहमद आणि अयुब कल्लाडा या दोन मोठ्या उद्योगपतींचा पाठिंबा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना
एअर केरळ आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यापूर्वी प्रादेशिक उड्डाणे सुरू करण्याचा विचार करत आहे. एअर केरळच्या ताफ्यात २० विमाने आल्यानंतर ही एअरलाइन आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करू शकते. सध्या ही सेवा दुबईमध्येच सुरु असणार असून नंतर इतर मार्गांवरही सुरू करण्यात येणार आहे.