प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ
कॉलेजमध्ये रजिस्टरच्या ऑफिसमध्ये गेले आणि मान खाली घालून रजिस्टारला म्हटले की, “मी तीन दिवसांपूर्वीच जॉईन झाले; पण मस्टरवर सही करायची विसरले.” तिने विचारले की, “तुम्ही बायोमेट्रिक केलं ना?” अरे बापरे तेही केले नाही, हे लक्षात आले.
“तीन दिवसांच्या तुमच्या सुट्ट्या धरल्या जातील,” असे तिने म्हणताच, मी म्हणाले की, “नाही… म्हणजे मी अगदी वेळेवर येऊन व्यवस्थित लेक्चर्स-प्रॅक्टिकल्स घेतले आहेत. त्याचा संपूर्ण रेकॉर्ड आहे माझ्याकडे. कारण विद्यार्थ्यांचे अटेंडन्स रेकॉर्ड आणि मी सह्या केलेले जर्नल्स तुम्हाला तपासता येतील.” पण ती आवाज चढवून म्हणाली की, “बायोमेट्रिक नाही ना?”
मीही चिडून म्हणाले की, “प्रत्यक्ष बायोमेट्रिक नसले, तरी प्रत्येक वर्गात आणि आमच्या लॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेतच की आणि हो, कॉलेजमध्ये मी आत आले आणि बाहेर गेले, त्या वेळासुद्धा तिथून सहज पाहता येतील. या सगळ्यांना पाहून, आपण माझी वेळ टाकू शकता आणि पाहू शकता की, मी कॉलेजच्या नियमाप्रमाणे कॉलेजमध्ये होते ते.” मग ती म्हणाली की, “तसे नाही करता येणार.” नियम म्हणजे नियम. तुम्ही बायोमेट्रिकच करायला पाहिजे होते. मी माझी बाजू नेटाने धरून पुढे बोलले की, “बराच काळ आजारी होते, त्यामुळे काही गोष्टी कशा कोणास ठाऊक विस्मृतीत गेल्या; पण टेक्नॉलॉजीचे म्हणाल, तर मी कॉलेजमध्ये आल्याच्या, मी कॉलेजमध्ये शिकवल्याच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत ना… त्याचा कॅमेरा रेकॉर्ड मिनिट टू मिनिट तुम्हाला माझ्याविषयीची संपूर्ण माहिती देतोय की, ती गृहीत धरा ना प्लीज.” तिने दूरची एक फाईल समोर ओढली, याचा अर्थ तिला आमचे संभाषण आता संपवायचे होते. खाली मान घालून, त्या फाईलकडे पाहत ती म्हणाली, “नाही मॅडम, तुम्ही पुढच्या तीन दिवसांची सुट्टी रजेमध्ये वाढवून, रजेचा नवीन अर्जस भरून द्या.”
आधीच आजारपण, त्याची दीर्घ सुट्टी आणि आता काम करूनसुद्धा तीन दिवसांची अधिकची सुट्टी… याचा विचार करत, दुःखी मनाने मी रजिस्टरच्या ऑफिसमधून बाहेर पडत होते आणि माझे डबडबलेले डोळे मी पुसत होते. इतक्यात सोसायटीच्या सिक्युरिटीने जोरात शिटी वाजवली. त्या शिटीमध्ये त्याचा वैतागही मला नेहमी जाणवतो. नक्कीच कोणी तरी सोसायटीच्या नियमाबाहेर काही तरी करत असणार. मला टक्क जाग आली. मी सहज तोंडावरून हात फिरवला, तर डोळ्यांतून पाणी येत होते.
होय, म्हणजे स्वप्नच होते ते. सहज कॉलेजचे दिवस आठवले. लेक्चर-प्रॅक्टिकल घेणे, त्यांच्या जर्नल्स तपासणे, पेपर काढणे, पेपर तपासणे, निकाल तयार करणे या सगळ्या गोष्टींमध्ये सवयीने असो की काय, आपण माहीर झालेलो असतो म्हणजे त्याच्यात सहसा चुका होत नाहीत. शिवाय तो आपल्या कामाचा आणि खूपदा आनंदाचाही भाग असतो. जसजसे वय वाढते, तशी टेक्नॉलॉजिकल कामे सुरळीतपणे जमतातच असे नाही; पण माणुसकीच्या दृष्टीने या बाबी समजून घेतल्या गेल्या नाहीत, अशा स्वप्नाने मी हादरून गेले. माणसापेक्षा टेक्नॉलॉजी जास्त महत्त्वाची. याचे खूपदा या पूर्वीही दुःख झालेले आहे, ते आठवले.
रुटीन ब्लड चेकिंगसाठी एक तरुण मुलगा घरी आला होता. त्याने हातामध्ये ग्लोव्हज घातले. पिशवीतून कापूस बाहेर काढला. अँटिसेप्टिक अल्कोहोलची डबी बाहेर काढली. आता मला वाटले की, तो अल्कोहोल कापसावर घेऊन, माझ्या हातावर लावणार आणि माझे रक्त काढणार; पण पाच मिनिटे तो वेगळंच काम करत होता. म्हणजे त्याने त्या बाटल्यांचा फोटो काढला. मग त्या बाटल्यांवर पेनाने काही तरी लिहिले. मोबाइलवर दोन-चार बटन दाबून, तो फोटो कुठे तरी पाठवला आणि मग तो परत हातातून रक्त काढण्यासाठी माझ्याकडे वळला. सांगायची गोष्ट हीच की, तो किती वाजता घरात आला, त्याने किती वाजता रक्त काढले, याचा फोटो जेव्हा तो पाठवतो, तेव्हा त्याची आमच्या घरात तो आल्याची वेळ आणि त्याचे काम करून जाण्याची वेळ ही त्या संस्थेला पूर्णपणे माहीत होते; परंतु रक्त काढण्यापेक्षा या टेक्नॉलॉजिकल बाबींकडे त्याचे जास्त लक्ष होते. ग्लोव्हज घालून इकडे-तिकडे हात न लावता, सरळ रक्त काढण्याची आवश्यकता होती. म्हणजे जी सुरक्षितता अपेक्षित होती, ती तशी झाली नाही; कारण त्याने पेनला तसेच मोबाइलला हात लावला होता. असंख्य सूक्ष्म जंतू हातात घेऊन, त्याने पुढील रक्त काढण्याचे काम केले होते. हेच सगळे चुकीचे असले, तरी त्याच्या संस्थेकडून अशाच कामाची त्याला सक्ती केलेली होती.
आजकाल मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग होते. विविध कामांसाठी येणारी मुले ही दारातच दिल्या-घेतल्या वस्तूंचा फोटो काढून, पाठवताना मी पाहिते. अगदी ‘झुरळ प्रतिबंधक’ केमिकल घरात शिंपडणारा माणूस किती वाजता घरात आला, यासाठी मला त्याला ओटीपी द्यावा लागतो. तसेच तो घरातून निघतानाही ओटीपी द्यावा लागतो. ही मुले घरामध्ये चहासुद्धा प्यायला थांबत नाहीत; कारण त्यांच्या प्रत्येक क्षणांचा रेकॉर्ड या टेक्नॉलॉजीद्वारे त्या संस्थेपर्यंत पोहोचतो. ते कुठेही चहासाठीही वेळ घालवू शकत नाहीत. बाकी त्यांच्या वाहनांवरही या संस्थांचे लक्ष लोकेशनद्वारे असू शकते, याची शक्यता नाकारता येत नाही.
टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे आहेत. मी हे अजिबात नाकारत नाही; परंतु कामापेक्षा या टेक्नॉलॉजीच्या ओझ्याखाली माणसे दबत चालली आहेत, असे वाटते. माणसांचे माणूसपण कधीकधी यामुळे गोत्यात येते, याचेही वाईट वाटते! त्यामुळे टेक्नॉलॉजीच्या पलीकडे जाऊन संवेदनशीलतेने कधी काळी माणसांना घ्यावे, एवढीच अपेक्षा आहे!
pratibha.saraph@ gmail.com