Thursday, March 20, 2025
Homeक्राईमVasai murder news : वसईत भर रस्त्यात डोक्यात स्पॅनरने वार करत प्रियकराने...

Vasai murder news : वसईत भर रस्त्यात डोक्यात स्पॅनरने वार करत प्रियकराने केली प्रेयसीची हत्या!

रक्ताच्या थारोळ्यात पडली तरुणी; बघ्यांची गर्दी पण वाचवायला कोणीच आलं नाही

वसई : प्रेमाच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना वसईतून समोर आली आहे. वसईत भर रस्त्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या डोक्यात लोखंडी पान्याने वार करत तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, तो हे कृत्य करत असताना रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमलेली असूनही वाचवायला मात्र कोणीच पुढे आलं नाही. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील चिंचपाडा येथे एका वीस वर्षीय तरुणीला आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका तरुणाने बेदम मारहाण केली. हल्लेखोराने स्पॅनरचा वापर करून तिच्या डोक्यावर हल्ला केला. ती तडफडत असताना तो तिच्यावर वार करतच राहिला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला अडवण्याची हिंमत केली नाही. हे वार करत असताना तो सतत ‘माझ्यासोबत असं का केलं?’ असा प्रश्न विचारत होता. ती मेल्यानंतर देखील तो प्रश्न विचारत होता. या अत्यंत क्रूर प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअपच्या रागातून आरोपीने प्रेयसीची हत्या केली आहे. रोहित यादव असं आरोपीचं नाव आहे. तर आरती यादव असं मृत तरुणीचं नाव आहे. सध्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.

दिल्लीतील हत्याकांडाची पुनरावृत्ती

वसईच्या या घटनेने दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत प्रियकराने १६ वर्षांच्या प्रेयसीला चाकूने भोसकले होते. आरोपीने तरुणीवर चाकूचे ४० वार केले होते. जिथे हत्याकांड घडले तिथे लोक आजूबाजूने जात होते, मात्र काहीच घडलं नाही अशा अविर्भावात दुर्लक्ष करुन निघून जात होते. कोणीही धाडस करत अल्पवयीन मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नव्हता. आता तब्बल एक वर्षांनंतर वसईतदेखील घडलेल्या या घटनेने दिल्ली हत्याकांडाचा घटनाक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -