Saturday, June 13, 2026

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

Raigad News: आईने चार मुलांना विषारी थंडपेय पाजून स्वतःही केले विषप्राशन; तिघांचा मृत्यू, दोन मुलांची प्रकृती गंभीर

रायगड : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. खरवली आदिवासी वाडी येथे एका आईने आपल्या चार लहान मुलांना विषारी थंडपेय पाजल्यानंतर स्वतःही विषप्राशन (Poison) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी प्रकारात आईसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला असून दोन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Suicide News)

मिळालेल्या माहितीनुसार, आशा जाधव (वय 29) यांनी बाजारातून आणलेल्या थंडपेयामध्ये विषारी औषध मिसळले. त्यानंतर त्यांनी आपल्या चार मुलांना ते थंडपेय पाजले आणि स्वतःही ते प्राशन केले. काही वेळातच सर्वांची प्रकृती बिघडू लागली. उलट्या आणि अस्वस्थता वाढल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारादरम्यान आशा जाधव यांच्यासह त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आशा जाधव, नंदिनी जाधव (वय 7) आणि दुर्वा जाधव (वय 6) यांचा समावेश आहे.

या घटनेत इतर दोन मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या टोकाच्या निर्णयामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, मानसिक तणाव किंवा इतर कोणते कारण यामागे होते का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असून कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून माहिती घेतली जात आहे.

या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, दोन निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू आणि दोन मुलांचे मृत्यूशी सुरू असलेले युद्ध यामुळे नागरिकांमध्ये दुःख आणि संतापाचे वातावरण आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >