Saturday, June 13, 2026

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघरमध्ये भररस्त्यात तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; CCTV व्हायरल, प्रकृती चिंताजनक

Palghar Crime : पालघर : पालघर (Palghar) शहरात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला (Attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोल्ड सिनेमा हॉल परिसरात घडलेल्या या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला असून, त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Koyta Attack)

मिळालेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी सायंकाळी सुमारे ६.१३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला रस्त्याने चालत असताना तिच्या मागून आलेल्या एका व्यक्तीने अचानक कोयत्याने हल्ला केल्याचे दिसत आहे. आरोपीने महिलेच्या मानेवर आणि कमरेवर वार केल्याचा आरोप आहे.

हल्ला होताच महिला रस्त्यावर कोसळली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. काही वेळाने तेथून जाणाऱ्या नागरिकांनी जखमी महिलेला पाहताच मदतीसाठी धाव घेतली आणि तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी महिला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, सूडभावना किंवा इतर कोणता हेतू होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला अटक झाली आहे की नाही याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >