घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजार्यांनी केली तक्रार; चार-पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असल्याची शक्यता
मुंबई : मनोरंजनसृष्टीतून (Entertainment industry) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ‘द ट्रायल’ (The trial) या वेब सिरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली अभिनेत्री नूर मालबिका दास (Noor Malabika Das) आपल्या मुंबईतील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. धक्कादायक बाब म्हणजे तिचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वीच ६ जूनच्या आसपास झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या तिचा मृतदेह गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नूर मुंबईमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होती. नूरने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे म्हटले जात आहे. तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, त्यावेळी नूरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या स्थितीत दिसून आला. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचा अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येऊ शकेल. पोलिसांनी तिच्या घरातून औषधे, मोबाईल फोन आणि डायरीसह काही गोष्टी तपासाच्या कामासाठी ताब्यात घेतल्या आहेत.
दरम्यान, काल नूरच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांकडून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणीही समोर आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अखेर रविवारी एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने काल ९ जून रोजी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
कोण आहे नूर मालबिका दास?
नूर मालाबिका दास ही मूळची आसाममधील आहे. ती ३७ वर्षांची होती.तिने काही हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले होते. तसेच नूरने उल्लू अॅपवरील काही वेब सीरिजमध्ये काम केले होते. ‘सिसकियाँ’, ‘वॉकमॅन’, ‘तीखी चटनी’, ‘जघन्या उपाय’, ‘चरमसुख’, ‘देखी अनदेखी’, ‘बॅकरोड हलचल’ सारख्या वेब सीरिज, चित्रपटांचा ती भाग होती. डिस्ने प्लस हॉटस्टारवर स्ट्रीम झालेल्या ‘द ट्रायल’ सिरीजमध्ये नूरने काजोल आणि जीशू सेनगुप्तासोबत स्क्रिन शेअर केली होती.