आपण कोणतेही काम मनापासून करायचे ठरवले की, यश-मेहनतीचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते. ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम आलेली अवघ्या २३ वर्षांची कल्पना साऱ्यांच्या मनात कौतुकाचा विषय ठरली. त्यामुळे शाळेला तिचा अभिमान होता. तसेच शाळेसमोर चिक्क्या, गोळ्या विकणाऱ्या एका बाईंची मुलगी जिल्हाधिकारी बनली, हे ऐकून अनेकांनी तोंडात बोटे घातली. “विद्यार्थी मित्रांनो, गरिबी कधीच प्रगतीच्या आड येत नाही, फक्त आपल्या ध्येयावर आपली निष्ठा हवी.” असे कल्पनाची म्हणाली.
कथा – रमेश तांबे
शाळेचे सभागृह तुडुंब भरले होते. विद्यार्थी, शिक्षक, शाळेचे विश्वस्त सारे अगदी झाडून उपस्थित होते. त्याला कारणही तसेच होते. कल्पना केदार ही शाळेची माजी विद्यार्थिनी ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम आली होती. ती लवकरच महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याची जिल्हाधिकारी बनणार होती. त्यामुळे तिचा शाळेला अभिमान वाटत होता. अवघ्या २३ वर्षांची कल्पना साऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली होती.
सकाळीबरोबर १०.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुख्याध्यापकांसह सारे विश्वस्त आणि कल्पनाला विशेष मदत करणारे कवाडे गुरुजीदेखील व्यासपीठावर विराजमान झाले होते. व्यासपीठाच्या अगदी मधोमध प्रसन्न चेहऱ्याची शिडशिडीत बांध्याची कल्पना बसली होती. तिच्या प्रसन्न चेहऱ्यावर तिने मिळवलेल्या कौतुकास्पद यशाचे तेज झळकत होते. कार्यक्रमाला सुरुवात होताच, साऱ्या सभागृहाने उभे राहून, टाळ्यांच्या कडकडाटात कल्पनाला मानवंदना दिली आणि सगळ्यांच्या मनामनातून चैतन्याची एक लहर उमटली.
मग सर्व विद्यार्थ्यांच्या साक्षीने कल्पनाचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्वांची गौरवपूर्ण भाषणे झाली. प्रत्येकाने कल्पनाने केलेल्या कष्टाचा, मेहनतीचा, तिच्या बुद्धिमत्तेचा गौरव केला. सर्वात विशेष भाषण रंगले, ते कल्पनाला शिकवणाऱ्या कवाडे गुरुजींचं. त्यांनी कल्पनाने घेतलेल्या परिश्रमाचं, अभ्यासाचं, संयमाचं गुणगान केलं; पण जेव्हा त्यांनी कल्पनाच्या आई-बाबांचा विषय काढला, तेव्हा मात्र कल्पनाने सरांना नको म्हणून मानेनेच खुणावले. मग पुढची पाच-दहा मिनिटे कवाडे सर बोलत होते. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, तर कधी टाळ्यांचा कडकडाट होत होता. कधी सारे सभागृह हास्यकल्लोळात डुंबून जात होते!
सर्वांच्या भाषणानंतर आता वेळ होती, ती मुख्य भाषणाची म्हणजेच कल्पनाची. साऱ्यांच्या अभिमानाचा विषय ठरलेल्या कल्पनाने आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी खुर्चीवरून उठताच, पुन्हा एकदा सारे सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात डुंबून गेले. “मी कल्पना केदार.” तिने बोलायला सुरुवात केली. मग तिने केलेला अभ्यास, तिच्या शिक्षकांनी विशेषतः कवाडे सरांनी तिच्या अभ्यासावर घेतलेली मेहनत, तिची अभ्यास करण्याची पद्धत यावर ती उत्साहाने बोलली. आपल्या भाषणातून समोरच्या विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळेल, असे ती बोलत होती. सर्व गुरुजनांचे ऋण व्यक्त करताच, शिक्षकवृदांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. शाळेने तिच्यासाठी कायम उपलब्ध करून दिलेल्या ग्रंथालयाबद्दल तिने शाळेचे देखील आभार मानले. सर्वात शेवटी व्यासपीठावरील मान्यवरांची परवानगी घेऊन, तिने शाळेसमोर चिक्क्या- गोळ्या विकणाऱ्या एका बाईला व्यासपीठावरती बोलावले. मधल्या सुट्टीत, शाळा सुटताना तिच्याकडे खाऊ घेण्यासाठी बरीच मुले जमायची. त्यामुळे सगळ्याच मुलांना त्या बाई माहीत होत्या; पण कल्पनाने त्यांना व्यासपीठावरती का बोलावले? याचे आश्चर्य मिश्रित कुतूहल साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले. व्यासपीठावरील कवाडे सर वगळता सगळेच संभ्रमात पडले.
त्या बाईंचं नाव पुकारताच, सभागृहात एकच गडबड सुरू झाली. मग एक काळी सावळी, साधीशी साडी नेसलेली एक बाई व्यासपीठावरती आली आणि चक्क कल्पना शेजारी जाऊन उभी राहिली. तितक्यात कल्पनाने त्या बाईंचे पाय धरले आणि त्यांना कडाडून मिठी मारली. हा प्रसंग सारे सभागृह अचंबित होऊन बघत होते. मग कल्पना काही बोलण्याऐवजी त्या बाईच बोलू लागल्या. ही माझी मुलगी कल्पना! ती जिल्हाधिकारी झाली, याचा मला अभिमान वाटतो. असे म्हणताच सारे सभागृह उभे राहिले आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. शाळेच्या समोर चिक्क्या, गोळ्या विकणाऱ्या बाईंची मुलगी जिल्हाधिकारी बनली, हे ऐकून अनेकांनी तोंडात बोटे घातली. कित्येकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. मग कवाडे सरांनी कल्पनाच्या आईचा यथासांग सत्कार केला. संपूर्ण सभागृहात कवाडे सरांशिवाय ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती. सत्कारानंतर कल्पनाची आई एकच लाख मोलाचे वाक्य बोलली. त्या म्हणाल्या, “विद्यार्थी मित्रांनो, गरिबी कधीच प्रगतीच्या आड येत नाही. फक्त आपल्या ध्येयावर आपली निष्ठा हवी.”