Tuesday, July 23, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखश्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी

ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण म्हणजे श्रीराम व्यायामशाळा. २ फेब्रुवारी १९३४ ला  ठाण्यातील पहिली संघ  शाखा श्रीराम व्यायामशाळेच्या आवारात सुरू झाली. त्यामुळे ठाण्यातील संघ स्वयंसेवकांमध्ये श्रीराम व्यायामशाळेला खूपच महत्त्व आणि आदराचे स्थान आहे. प्रखर देशभक्त आबा घाणेकर  यांनी १९३१ साली राष्ट्रीय भावनेतून तरुणांच्या शारीरिक विकासासाठी या ठिकाणी व्यायामशाळेची स्थापना केली होती. सुरुवातीला छोटीशी बैठी वास्तू आणि मोठं प्रांगण असं व्यायामशाळेचे स्वरूप होतं. या ठिकाणी सर्व देशी खेळ, व्यायाम, सूर्यनमस्कार घालण्यासाठी नियमितपणे युवा वर्ग येऊ लागला. युवा वर्गाबरोबर बालकांमध्येही राष्ट्र विचार, संस्कार, व्यायामाचे महत्त्व निर्माण व्हावं यासाठी सुरुवातीपासूनच बालवाडी देखील सुरू करण्यात आली होती; परंतु ही श्रीराम व्यायामशाळा  स्थापन  कशी झाली त्यामागेही एक इतिहास आहे.

विष्णू ऊर्फ आबा लक्ष्मण घाणेकर हे स्वतः अष्टपैलू व्यायामपटू होते. घाणेकर हे मध्य रेल्वेमध्ये मेकॅनिकल ड्राफ्ट्समन म्हणून काम करत होते. आबा स्वाभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ होते. रेल्वे कार्यालयात त्यांचा खातेप्रमुख एक ख्रिश्चन गृहस्थ होता. त्यांनी बोलण्याच्या ओघात घाणेकर यांचा तसेच हिंदुत्व विचारसरणीचा अपमान केला. ते सहन न होऊन आबांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला व त्यातून ते मुक्त झाले. त्यांचा पिंड तसा व्यायामाचा होता, त्यामुळे  ते हनुमान व्यायामशाळेत  मानद शिक्षक या नात्याने काम करू लागले. त्यांनी व्यायामशाळा चांगली नावारूपास आणली, उत्तम काम केलं की समाजाचे लक्षही तिथे वेधलं जातं, त्याप्रमाणे ठाण्यातील प्रतिष्ठित व सामाजिक काम करणाऱ्या मंडळींच्या ही गोष्ट लक्षात आली आणि  त्यांचं कौतुक होऊ लागलं; परंतु ते पाहून काही मंडळी त्यांच्यावर नाराज पण होऊ लागली. हनुमान व्यायामशाळेवर समाजवादी विचारवंतांचे वर्चस्व होते. आबा पक्के हिंदुत्व विचारसरणीचे, त्यामुळे वादावादी घडू लागली. ते पाहता आबा तिथून बाहेर पडले आणि त्यांनी देशी खेळांचे एक क्रीडा मंडळ सुरू केले. त्यात आट्यापाट्या, खो खो, विटी-दांडू, हुतुतू आदी खेळ खेळले जात असत. आबांचे खेळाडू पारितोषिक पण मिळवू लागले. त्यांनी ठाण्यातील  तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण केली. साधारणपणे १९३१ साली ठाण्यातील लोकसंख्या खूपच मर्यादित होती.

आतासारखं ठाणं पसरलं नव्हतं. कै. आबांशी सुपरिचित असलेले, ठाण्यातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते,  नामांकित वकील, तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी अशी कळकळ असणारे माधवराव हेगडे यांनी आबांना बोलावून घेतले व सांगितले की, तू व्यायामशाळा काढ, मी तुला जागा मिळवून देईन. हे ऐकून  आबांना फारच आनंद झाला. माधवराव हेगडे यांच्या प्रयत्नाने  क्रीडा मंडळाला ठाणे नगरपालिकेच्या शाळा क्र. २ (दगडी शाळा)च्या मागील मोकळी जागा मिळाली. त्या ठिकाणी कै. आबांनी “मोफत शारीरिक शिक्षण वर्ग” सुरू केला. २५-३० तरुण व ३०-४० बालक नित्यनियमाने येऊ लागले. या वर्गात लाठी, काठी, लेझीम,  वेत्र – चर्म, दांडपट्टा, मल्लखांब यांसारखे क्रीडा प्रकार शिकविले जात. याशिवाय डबल बार, सिंगल बार, रिंग्ज,  जळत्या कड्यामधून उड्या मारणे, रोप वॉकिंग सारखे खेळही शिकविले जात असत. तसेच जोड्या ड्रील, बैंड ड्रील, पोल ड्रील, पी. टी. ड्रील, स्कॉड ड्रील हे विषयही शिकविले जात असत.

कै. आबांच्या अथक परिश्रमामुळे वर्गाची इतकी झपाट्याने प्रगती होऊ लागली की, दगडी शाळेमागील जागा अपुरी पडू लागली. आबांनी माधवराव हेगडे यांना सल्ला विचारला व अडचणी पण सांगितल्या, त्या ऐकून कै. माधवराव हेगडे यांनी दुसरी मोठी जागा मिळवून देण्याचे कबूल केले. कै. माधवराव हेगडे, यांचे अशील शेठ दामोदरदास त्रिभुवनवास यांचेकडे त्यांनी वर्ग चालविण्यासाठी जागेची मागणी केली. कै. आबा घाणेकर यांनी सर्व जबाबदारी स्वतःकडे घेऊन  आपला मोफत शारीरिक शिक्षण वर्ग या जागेत आणला. इ. स. १९३२ च्या अखेरीस, मोफत शारीरिक वर्गाचे रूपांतर “श्रीराम व्यायामशाळा” या नावाने झाले व सध्या  श्रीराम व्यायामशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेत ती कार्यरत झाली. अशा रितीने श्रीराम व्यायामशाळेच्या स्थापनेचा थोडक्यात इतिहास आहे. आबा घाणेकर श्रीराम व्यायामशाळेचे संस्थापक, चालक व पालक झाले.  कै. आबांच्या अथक परिश्रमामुळे श्रीराम व्यायामशाळा स्वतःच्या जागेत लवकरच उत्तरोत्तर भरभराटीला आली.

व्यायामशाळेत खेळाडू पारंगत झाल्यानंतर त्यांना मुंबई, ठाणे इथल्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायला पाठवण्यात येऊ लागले. आबांचाही हळूहळू राज्यातल्या विविध उत्कृष्ट खेळाडूंची संबंध येऊ लागला. त्या काळात ठाणे येथे संघाची शाखा सुरू झाली नव्हती; परंतु आबा घाणेकर हे प्रखर हिंदुत्ववादी असल्यामुळे त्यांनी श्रीराम व्यायामशाळेमध्ये संघाची शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आणि २ फेब्रुवारी १९३४ या दिवशी ठाण्यात सर्वप्रथम  दादाराव परमार्थ यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरू झाली. सुरुवातीपासूनच सकाळी ६.३० ते ७.३० प्रभात शाखा आणि संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत सायं शाखा भरू लागली.

१९३५ साली ठाण्यातून पहिल्यांदाच पाच जण नागपूर येथे संघ शिक्षा वर्गासाठी गेले आणि ते तिथून संघ शाखा संचालन शिकून आल्यानंतर काम अधिक जोमात सुरू झाले. १९४२ साली ट्रस्ट मूर्त स्वरूपात नोंदणीकृत करण्यात आला. ट्रस्टचे पहिले सदस्य ख्यातनाम वकील असलेले माधवराव हेगडे, विनायक भावे, सुप्रसिद्ध वकील वासुदेव रामचंद्र नाचणे, वकील  दत्तात्रेय दगडू नाखवा व  विष्णू ऊर्फ आबा लक्ष्मण घाणेकर होते. या काळापर्यंत व्यायामशाळा ही  आबांच्या वैयक्तिक मालकीची होती. तसेच ते श्रीराम व्यायामशाळेचे चालक व पालकही होते. श्रीराम व्यायामशाळेचे त्यानंतर काही काळानं विश्वस्त दत्तोपंत दगडू नाखवा, यशवंत दत्तात्रय सुळे, वकील श्रीनिवास वामन ओक, माधव विनायक कुलकर्णी, प्रभाकर  कुलकर्णी हे होते.

श्रीराम व्यायामशाळेची एकूण जागा सुमारे २४०० चौरस फूट आहे. त्या काळात इथे ताडाची व शिंदीची झाडे होती. १९३२ साली ठाण्यातील एक दानशूर व समाज कार्यकर्ते कै. दगडूशेट नाखवा यांचा जळाऊ लाकूड, इमारती लाकूड, मंगलोरी कौले इ.चा मोठा व्यापार होता. त्यांच्या सहयोगाने व्यायामशाळेच्या जागेच्या मधोमध ४०’x२०’ची एक शेड बांधण्यात आली. या शेडवर छप्पर होते व चोहोबाजूला कारवीचे कूड होते. या शेडमध्ये व्यायामाची आयुधे ठेवण्याकरिता एक खोली होती. शेडमधील बाकीची जागा वैयक्तिक व्यायामाकरिता वापरली जात असे. मैदानी कार्यक्रम व खेळ बाहेरील पटांगणात होत असत. पण १९३८ साली ठाणे शहरात फार मोठे वादळ झाले. या वादळामुळे व्यायामशाळेचे छप्पर उडून शेडचे मोठे नुकसान झाले. ते पाहता ठोस उपाययोजना करावी म्हणून  आबा व त्यांचे सहकारी यांनी नवीन इमारत उभी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीची कामे व्यायामासाठी येणारी मंडळी व व्यायामशाळेतील विद्यार्थी यांनी स्वतः अंग मेहनत करून पार पाडली. नंतर इतर बांधकाम पूर्ण झाले.

त्यानंतर १९७० साली माधवराव कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नव्याने इमारतीची बांधणी झाली. यावेळी ठाण्यातील अनेक संघ कार्यकर्त्यांनी मोठी आर्थिक मदत दिली तसेच इतरही दात्यांच्या सहाय्यामुळे  बैठी इमारत उभी राहिली. अशा तऱ्हेने १९३४ सालापासून ९० वर्षे श्रीराम व्यायामशाळेच्या माध्यमातून ठाण्यातील युवक आणि बालकांना सुदृढ बनवणं,  बालवाडीच्या माध्यमातून सुसंस्कारित करणं, राष्ट्रीय विचारांनी संस्कारित करून  त्यांना देशकार्यासाठी प्रेरित करण्याचं  काम सुरू आहे. इतक्या वर्षांत या व्यायामशाळेतून अनेक युवक तसेच बालकांनी व्यायामाचे प्रशिक्षण घेतले आहे. व्यायाम, सूर्यनमस्कार, देशी खेळ इथे गेले ९० वर्षे शिकवले जातात. त्याशिवाय संघाची शाखा ही इथे नियमित  भरत असते. २०१६ नंतर विविध सामाजिक कामे सुद्धा इथले युवक, कार्यकर्ते करू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला योगासन दिवस मोठ्या उत्साहात येथे दरवर्षी साजरा केला जातो, संविधान दिवस साजरा करून घटनेचे वाचनही संस्थेमध्ये केले जाते. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर अशा काळातही समाजाला मदत करायला हवी या हेतून सुद्धा संस्थेमार्फत कामं केली जाऊ लागली आहेत.

कोरोना काळात अन्न छत्र चालवणं, ठाण्यात आलेल्या वादळामध्ये पडलेल्या झाडांना कापून झाल्यावर योग्य निपटारा करणे, चिपळूणमध्ये आलेल्या  वादळ आणि पुरामध्ये तिथल्या गावकऱ्यांना वस्त्रांचे वाटप करणे आणि तिथली काही घरं बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे  अशी कामे देखील संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत सुरू झाली. त्यामुळे श्रीराम व्यायामशाळा ही केवळ व्यायामशाळा न राहता ती सेवा संस्था बनली आहे आणि म्हणूनच २०१६ साली संस्थेच्या उद्देशांमध्ये वाढ करण्यात आली. त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करून घेऊन श्रीराम व्यायामशाळा हे नाव श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था असे करण्यात आले. संबंधित खात्याकडून परवानग्या मिळून संस्था १२A, ८०G च्या आधारे CSR उपक्रमात सेवा देण्यासाठी सुद्धा सज्ज झाली आहे.

इथे येणारे कार्यकर्ते तसेच युवकांकडून सामाजिक कामाचा पसारा खूप वाढू लागला. त्यामुळे एक अद्ययावत अशी इमारत उभारण्याचे श्रीराम शाळेच्या विश्वस्त मंडळांनी गेल्या वर्षी ठरवले. व्यायामशाळेच्या अद्ययावत अशा इमारतीचे बांधकाम सुरूही झाले आहे. या इमारत बांधणीला सुरुवात होण्यापूर्वी शंभर पर्यंत युवक, कार्यकर्ते इथे शाखेत आणि व्यायामशाळेत येत असत. तसंच बालवाडीमध्ये ६० पटसंख्या असे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शतक महोत्सवी वर्ष लवकरच सुरू होत आहे. तोपर्यंत इमारतीचं काम पूर्णत्वाला नेण्याची विश्वस्त मंडळाची योजना आहे. अद्ययावत इमारत उभी करण्यासाठी अर्थातच आर्थिक सहकार्याची गरज आहे. ठाण्यातील अनेकांचे आर्थिक  सहकार्य लाभत आहे. त्याशिवाय इतरांनीही संस्थेला सहाय्य करावं असं विश्वस्त मंडळ आवाहन करत असल्याचे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्तांनी सांगितले. ही इमारत बांधून झाल्यानंतर या ठिकाणी हॉल, व्यायामशाळा तसेच एक मोठे पटांगण उपलब्ध होणार आहे. आज ठाणे शहर अफाट वाढत आहे; परंतु श्रीराम व्यायामशाळा  ठाणे शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागात असल्यामुळे व्यायाम, योगासनं करण्यासाठी सर्वांना एक दर्जेदार स्थान उपलब्ध होणार आहे. आबा घाणेकर यांनी श्री राम व्यायामशाळेचे  बीज रोवले. १९७० पर्यंत त्याचा वृक्ष झाला आणि आता २०१६ नंतर त्याचं वटवृक्षात रूपांतर होत आहे. त्याच्या सेवेच्या पारंब्या समाजातील तळागाळापर्यंत पोहोचाव्या यासाठी नवीन इमारत आता मूर्त रूप घेत आहे.
 joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -