Thursday, June 11, 2026

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा गुरुवारी केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल येथील 'वाहतूक भवन' या महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देताना, "सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे," असे आवाहन केले.

यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल असे देखील ग्वाही दिली.

बैठकीत काय ठरले?

- या बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. - कामगार संघटनांशी सातत्याने संवाद साधून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. महामंडळाच्या सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती तातडीने स्थापन करण्यात यावी. उत्पन्नवाढीसाठी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

२०३५ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक

आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली २०३५ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी राज्यभर आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठीही ठोस उपाययोजना सुरू असल्याचे सांगताना मंत्री सरनाईक यांनी बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरुद्ध धडक मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्नावाढीवर झाला असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. "कर्मचारी आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून एसटी महामंडळ अधिक सक्षम, प्रवासी-केंद्रित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे," असा विश्वास व्यक्त करत मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका कायम राहील, अशी ग्वाही दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >