Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखअवयवदान प्रबोधनाची चळवळ

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम

शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली व्यक्ती अनेकांच्या पाहण्यात येत असते. जीवनातील शेवटची घटका मोजत असलेले असे हजारो रुग्ण आपल्या आसपास आहेत की, ज्यांच्या डोळ्यांदेखत अवयव देऊ करणारा दाता दिसत असूनही त्यांना त्यांचे प्राण वाचविता येत नाहीत. लोकसंखेच्या बाबतीत जगात पहिला असणारा एकशे चाळीस कोटींचा भारत देश अवयावदानात मात्र जगात शेवटून दुसरा असावा ही एक शोकांतिका म्हणता येईल. ही वस्तुस्थिती दूर व्हावी या उद्देशाने देशात अनेक व्यक्ती व संस्था अवयवदान या विषयात झटून कार्यरत आहेत. मात्र त्यांचे कार्य एकसंध व्हावे, त्यांना त्यांच्या कार्यात येणाऱ्या सरकारी तसेच इतर प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात, अवयवदान व देहदान या संदर्भातील लोकप्रबोधनाच्या कामाला मोठी चालना मिळावी याकरिता या सर्व लहान-मोठ्या संस्था एका धाग्याने बांधून या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन या संस्थेने महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर देश पातळीवरही सुरू केला आहे. फेडरेशनची १७ मे २०१५ रोजी स्थापना करण्यात आली आणि २०१७ मध्ये, बरोबर दोन वर्षांनी १७ मे रोजीच फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन, मुंबई या नावे ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदविली गेली. यंदा ती आपला नववा वर्धापन दिन साजरा करीत आहे.

ठाणे जिल्ह्यातील वसईसारख्या विकसित भागात आपल्या “देहमुक्ती मिशन” या संस्थेच्या माध्यमातून अवयव व देहदान या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांना, त्यांना आलेल्या प्रदीर्घ अनुभवातून, एका व्यापक संस्थेची म्हणजेच महासंघाची निकड भासू लागली होती. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या दूरदर्शी प्रयत्नांमुळे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन’ ही संस्था स्थापन झाली.

रक्तदान याविषयी जनमानसात चांगल्या प्रकारे प्रबोधन झालेले आहे. त्यामुळे रक्तदानासाठी स्वतः होऊन पुढे येणारे दाते आज उपलब्ध होत असतात. विविध मंडळे, सामाजिक, राजकीय संस्थांकडून रक्तदानाचे कार्य बऱ्यापैकी सुरू आहे; परंतु नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान करण्याची एखाद्या व्यक्तीची इच्छा असूनदेखील प्रत्यक्षात ते करण्याची वेळ येते, त्यावेळी ती व्यक्ती तेथे हयात नसते. तर तिथे असते त्याचे मृत शरीर. अशा वेळी त्याच्या जवळच्या नातेवाइकांची, कुटुंबातील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरते. अशा अत्यंत हळव्या किंवा भावनोद्दीपक अवस्थेत मृताच्या आप्तजनांना अवयव वा देहदानाची जाणीव करून देणे हे मोठे संयमाचे व जोखमीचे काम असते. अशातही जनजागृती करणाऱ्या अनेक व्यक्ती व सामाजिक संस्था सर्वस्व झोकून काम करत आहेत.

आपापल्या कक्षेत काम करताना त्यांना विविध अडचणी येतात; त्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांचे प्रयत्न देखील अपुरे पडतात. फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी चळवळीची ही अडचण अनुभवली होती. त्यामुळे त्यांनी अनेक व्यक्ती व संस्थांच्या प्रमुखांना वारंवार भेटून या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आपण एकत्र येणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगितले. तसेच पुढाकार घेत मुंबई येथे सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये देहदानाचे कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांची बैठक बोलावली आणि एकमुखाने महासंघाची मुहूर्तमेढ रोवली. फेडरेशनच्या छत्राखाली सर्व स्थानिक संस्थांनी एकत्र येऊन एकमेकांशी समन्वय साधत कार्य सुरू केल्याचे अनेक फायदे दिसू लागले.

केवळ मुंबई शहर आणि उपनगरे यांच्यापर्यंतच संगठन मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर हे कार्य विस्तारण्याच्या दृष्टीने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत कार्याची घोडदौड चालू ठेवली. फेडरेशनची स्थापना करताना आरोग्य क्षेत्रात मोठी रुग्णसेवा देणारे हरकचंदजी सावला यांना प्रथम अध्यक्षपदाचा मान दिला गेला, तर संस्थापक पुरुषोत्तम पवार यांच्या बरोबरीने सुधीर बागाईतकर, विनोद हरिया, कुलीनकांत जी लुठीया, विनायक जोशी आदींप्रमाणेच दधीची देहदान समिती, मानव ज्योत, जीवन ज्योत, सुमती ग्रुप अशा प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी देखील फेडरेशनच्या उभारणीत मोलाचा भार उचलला.

कार्यकर्ते नेटाने कामाला लागले. महाराष्ट्रातील सर्व सक्रिय कार्यकर्त्यांना एका मंचावर आणून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी २०१६ मध्ये महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, मुंबई येथे अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी रीतीने आयोजित केले गेले. त्यापासून या कामात महाराष्ट्र सेवा संघाचे अनमोल सहाय्य लाभले ते आजतागायत. या अधिवेशनात सुप्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉक्टर वत्सला त्रिवेदी, तसेच डॉक्टर प्रवीण शिनगारे, नागपूरचे चंद्रकांत मेहेर आदी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. भारतात ज्यांच्यावर २००३ मध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले होते, असे नाशिक येथील डॉ. भाऊसाहेब मोरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. संमेलनाच्या या यशानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते फेडरेशनशी जोडले गेले.

बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेऊन अवयवदानाच्या प्रचारासाठी पदयात्रा काढणारे नाशिक येथील सुनील देशपांडे यांना त्यांच्या पदयात्रेसाठी फेडरेशनने संपूर्ण सहकार्य केले. या पदयात्रेद्वारे नाशिक ते आनंदवन (नागपूर मार्गे) या मार्गावर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ पायाखाली घातला जाऊन परिसरात अवयवदानाबाबत प्रबोधनाचे कार्य केले गेले. ही पहिली पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर फेडरेशनतर्फे कोकण आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडत मडगाव गोव्यापर्यंत दुसऱ्या पदयात्रेचे यशस्वी आयोजन केले गेले. त्यानंतर तिसऱ्या पदयात्रेदरम्यान औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, तुळजापूरपर्यंत संपूर्ण मराठवाडा पालथा घातला गेला. त्यानंतर नाशिक ते कर्नाटकातील थेट बेळगावपर्यंत चौथी पदयात्रा आयोजित करून पश्चिम व दक्षिण महाराष्ट्र पायाखाली घातला गेला, तर गेल्या फेब्रुवारी महिन्यात फेडरेशनतर्फे उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण आदिवासी जिल्ह्यांमधून पाचव्या खान्देश अवयवदान प्रबोधन रथयात्रेचे आयोजन केले गेले.

त्या दरम्यान धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील शहरी आणि आदिवासी भाग पिंजून काढत अवयवदानाच्या प्रबोधनाचा धमाका उडवून दिला गेला. चार पदयात्रा आणि रथयात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व शेजारच्या प्रदेशात अवयवदान प्रबोधनाचा झेंडा रोवताना फेडरेशनच्या कार्याचा ठसा उमटवला गेला. छोट्या छोट्या गावातून आणि मोठ्या शहरात असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना फेडरेशनच्या कार्यामध्ये सहभागी करण्यात आले. महासंघ राज्यभर बहरला. चौथी पदयात्रा पूर्ण झाली आणि एक महिन्यातच लॉकडाऊन सुरू झाला. अवयवदान क्षेत्र अधिक संवेदनशील असल्यामुळे या कार्याला शंभर टक्के कोरोनाची खीळ बसली. अवयवदानाची चळवळ ठप्प झाली असे वाटत असतानाच, फेडरेशनने झूम मीटिंग, गुगलमीट व बेबीनार अशा अनेक ऑनलाइन कार्यक्रमांचा सपाटा चालूच ठेवत चळवळ जागती ठेवली, बोलती ठेवली. फेडरेशनचे हे कार्य असेच यशस्वीपणे पुढे पुढेच आपण नेणार आहोत, असा आत्मविश्वास आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या रोमारोमात तयार झालेला आहे. (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -