पुण्यात विनोद तावडे यांचं वक्तव्य
पुणे : एनडीए सरकारची (NDA) दहा वर्षाची कामगिरी आणि २०४७ पर्यंतच्या विकसित भारताचे व्हिजन मतदारांपुढे मांडण्याचे काम भारतीय जनता पक्षाकडून (BJP) केले जात आहे. मोदी परत सत्तेत येणार असल्याचे वाटल्याने आत्तापर्यंतच्या दोन टप्प्यातील निवडणुकीत २० ते ३० टक्के बुथवर विरोधी पक्षांचे कार्यकर्तेच दिसले नाहीत. बऱ्याच जागांवर काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘आयेगा तो मोदीही’ ही भावना मतदार आणि विरोधी पक्षांमध्ये निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पुण्यात सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात तावडे बोलत होते. याप्रसंगी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, यंदाच्या दोन टप्प्यातील निवडणुकीची टक्केवारी गेल्यावेळेच्या पहिल्या दोन टप्प्यातील टक्केवारी इतकीच राहिली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात भाजपच्या ९ ते १५ जागा तर दुसऱ्या टप्प्यात अंदाजे ५ ते ७ जागा वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून मतदारांसमोर २०४७ च्या विकसित भारताचे व्हिजन मांडले जात आहे. तसेच प्रत्येक टप्पेनिहाय मुद्दे पुढे केले जात आहेत. याउलट विरोधी पक्षांकडून भाजप घटना बदलणार असल्याचा प्रचार केला जात असून तो साफ चुकीचा आहे. पूर्ण बहुमत असताना भाजपने कधीही घटनेला हात लावला नाही. काँग्रेसने यापूर्वी ८० वेळा घटनेत बदल केला. आम्ही फक्त ३७० कलम रद्द केले. ज्यांनी घटना लिहिली त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कॉँग्रेसने भंडाऱ्यातून लोकसभेला उभे करून त्यांचा पराभव केला. हे मतदार चांगले ओळखतात.
मविआकडून महिलांवर खालच्या पातळीची टीका
राज्यात शरद पवार आपल्या सुनेचा बाहेरची सून आणि संजय राऊत अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. काँग्रेसने आपल्या जाहिरातीत पहिल्यांदाच सोनिया गांधी, राहूल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे छायाचित्र वापरले नाही. कदाचित फोटो टाकले तर मतं कमी होतील अशी भीती असल्याने त्यांनी फक्त मुद्द्यांवर भर दिला आहे.
मोदींनी कधीही व्यक्तिगत राजकारण केले नाही
मोदींनी ठाकरे कुटुंबियांच्या कायम पाठिशी असल्याचे विधान नुकतेच एका मुलाखतीत केले आहे. याबाबत तावडे म्हणाले, मोदींनी कधीही व्यक्तिगत राजकारण केले नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत सुद्धा मोदी हेच म्हणाले होते. मनसेने महायुतीला दिलेला पाठिंब्याबद्दल विकसित भारताच्या योजनेमध्ये कोणी सहभागी होत असेल तर यामध्ये वावगे काहीच नाही, असेही तावडे यांनी सांगितले.