राजेश क्षीरसागर यांची टीका
कोल्हापूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यात एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी कोल्हापूरच्या राजघराण्यावर गंभीर वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
राजेश क्षीरसागर हे कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सतेज पाटील, सुषमा अंधारे यांच्यावर देखील टीका केली.
छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा, हे आम्हाला कोणीही शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्ही ठेवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पराभव समोर दिसत असतानासुद्धा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचे काम केले आहे, असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. सतेज पाटील घाणेरड राजकारण करत असतील तर कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला आले म्हणून त्यांचा जळफळाट का होतोय? ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी सभा घेतात त्या ठिकाणी उमेदवार निवडणून येतो, असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.
छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवू नका. छत्रपती संभाजी यांचा मान आम्हीच ठेवला आहे. शाहू महाराजांनी राजकारणात पडू नये, असं आम्हाला वाटतं. छत्रपती पद हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र आता शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
शाहू महाराजांना राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. छत्रपती घराण्याचे खरे वारसदार कोण? असा सवाल अनेकदा उपस्थित केला जात आहे. कदमबांडे यांची देखील चर्चा करण्यात आली. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधीच मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला. निवडणुकीमध्ये गादीचा अपमान होणार आहे मात्र असे करणाऱ्याला जनता माफ करणार नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.
एमआयएम पक्षाची कोल्हापूरमध्ये एकही शाखा नाही. कोण आहेत हे एमआयएमवाले? ते पुन्हा कोल्हापूरमध्ये आले तर आम्ही त्यांना फोडून काढू. आम्ही देखील हिंदू आहोत. सुषमा अंधारे हे फालतू, पेड बाई आहेत, असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंवर देखिल टीका केली.