Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

MNS vs Thackeray Group : 'चला आरशात पाहूया' म्हणत मनसेची उबाठावर सडकून टीका!

MNS vs Thackeray Group : 'चला आरशात पाहूया' म्हणत मनसेची उबाठावर सडकून टीका!

पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणारे जुने व्हिडीओ समोर आणत केली पोलखोल

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर उबाठाकडून टीका करण्यात आली आहे. 'मुन्नाभाईसारखी एक केस आपल्याकडे आहे, ज्याला स्वत:ला बाळासाहेब झालं असं वाटतं. हल्ली शाल घेऊन फिरतात' अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली. त्यावर आता मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार्‍या वक्तव्यांचे जुने व्हिडीओ शेअर करत 'चला आरशात पाहूया' अशी सडकून टीका केली आहे.

दर निवडणुकीला उद्धव ठाकरेंची बदलली भूमिका

संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंची २००९, २०१४, २०१९ आणि २०२२ मधील काही वक्तव्ये असणारी पोस्ट शेअर केली आहे. २००९ साली उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप चांगले आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाईट आहे. २०१४ साली म्हणाले, भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकीनंतर परत भाजप चांगले असं ते म्हणाले. २०१९ साली म्हणाले, विधानसभा लढताना भाजप चांगले, काँग्रेस-राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी चांगले भाजप वाईट. आता २०२२ साली म्हणतात, उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक वाईट.

यासोबतच उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात ते म्हणतात, 'यापुढे जे काही असेल ते एकट्या शिवसेनेचं असेल. मी युतीसाठी कोणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही'. मात्र, त्यांच्या या वक्तव्याच्या विरुद्ध परिस्थिती सध्या दिसत आहे.

संजय राऊत यांचेही व्हिडीओ केले शेअर

संजय राऊत यांचेही काही जुने व्हिडीओ संदीप देशपांडे यांनी शेअर केले आहेत. यामध्ये आता पंतप्रधानांवर टीका करणारे संजय राऊत त्यांचं गुणगान गाताना दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय देशाच्या जनतेला इतर कोणताही नेता बघायचा नाही, असंही ते म्हणाले आहेत. भाजपाला आम्ही नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे मानले आहे आणि भाजप ही भूमिका कायम बजावेल, असं ते म्हणतात. शिवाय ते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याविरोधात बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचीच पलटी खाणारी भूमिका त्यांना दाखवून संदीप देशपांडे यांनी चांगलाच डाव साधला आहे.

Comments
Add Comment