- कथा : रमेश तांबे
चिऊताई म्हणाली, राणी हुशार कशी? तिला तर स्वतःची कामेसुद्धा करता येत नाहीत. आम्ही कुठल्याही शाळेत न जाता सर्व गोष्टी करतो. तुम्ही पुस्तकातले वाचून, लिहून काढता, मग तुम्ही हुशार कसे? आम्हीच हुशार असे चिमणीने मुलांना सांगितले.
एक होती मुुलगी. तिचं नाव राणी. एके दिवशी राणी सकाळी अभ्यासाला बसली होती. तितक्यात तिथे एक चिमणी आली. अन् राणीला म्हणाली, “राणी गं राणी, अभ्यास करतेस, शाळेत जातेस! मलाही तुझ्यासारखा अभ्यास करायचा आहे. मलाही तुझ्यासोबत शाळेत यायचंय.” ते ऐकून राणी चिमणीला म्हणाली, “अगं चिऊताई, तू शाळेत येऊन काय करणार? माझी वह्या-पुस्तके नेऊन काय करणार? तुला कशाला हवी शाळा!” चिमणी म्हणाली, “अगं राणीताई मला बघायचंय शाळेत जाऊन तुम्ही काय शिकता? तुम्ही हुशार होता म्हणजे तुम्हाला काय काय येतं ते बघायचेय मला.”
शेवटी राणी तयार झाली. म्हणाली, “चल गं चिऊताई शाळेत. पण तू लपून बस माझ्या शेजारी. कोणालाही दिसू नकोस. नाहीतर गोंधळ उडेल.” मग तयारी करून राणी शाळेत गेली. चिमणीदेखील शाळेत पोहोचली. शाळेत मुलांचा गडबड गोंधळ सुरू होता. तो आवाज ऐकून चिऊताईने तर कानावरच हात ठेवले आणि म्हणाली, “काय हा गोंधळ. जरा शिस्त नाही या माणसांच्या पोरांना!” शाळा भरायला अजून वेळ होता. मुले खेळण्यात रंगली होती. मारामाऱ्या, आरडाओरडा करत त्यांनी वर्ग डोक्यावर घेतला होता. पण एवढा वेळ चिऊताईने आपले कान गच्च बंद करून घेतले होते!
शाळा भरल्याची घंंटा वाजली. राणीच्या मॅडम वर्गावर आल्या. मॅडमच्या हातात कसलेसे कागद होते. राणी चिऊला म्हणाली, “चिऊ गप्प बस बरं का. आज आमचा रिझल्ट म्हणजे पास-नापास आहे. तू फक्त बघत राहा चिऊताई. मग मॅडमने एका एकाचे नाव पुकारून निकाल वाचन करायला सुरुवात केली. प्रथम क्रमांक राणीला मिळाला होता. राणीला खूप आनंद झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पण चिऊताईला कळेना राणीचा पहिला नंबर आला. म्हणजे आपली राणी सगळ्यात हुशार! पण कशी काय हुशार? राणीला तर काहीच येत नाही. तिला प्रश्न पडला. मग ती सरळ मॅॅडम जवळ गेली आणि सर्व मुलांना उद्देशून बोलू लागली. वर्गात चिमणी आल्याचे बघताच मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्या. पण मॅडमने छडी दाखवताच सर्व मुले गप्प बसली.
चिमणी बोलू लागली. “मुलांनो मला पाहायचं होतं, माणसांची मुलं शाळेत येऊन काय शिकतात? पण मला तर आश्चर्य वाटले. किती आवाज, केवढा गोंधळ आणि त्या मारामाऱ्या!” चिमणीचे बोल ऐकून मुलांची मान खाली गेली. चिमणी पुढे म्हणाली, “आज राणी वर्गात पहिली आली. म्हणजे तुमच्या वर्गात आमची राणी हुशार, हो ना रे मुलांनो! “हो हो” मुले म्हणाली. चिऊताई पुढे म्हणाली, “पण राणी हुशार कशी? तिला तर स्वतःची कामेसुद्धा करता येत नाहीत. स्वतःचं जेवण बनवता येत नाही. तिला आमच्यासारखं घर बांधता येत नाही. आम्ही कुठल्याही शाळेत न जाता सर्व गोष्टी करतो. मस्त पंख हलवून आकाशात उडतो. स्वतःचं घर स्वतः बांधतो. स्वतःचे जेवण स्वतःच मिळवतो. आमची छोटी बाळंदेखील आईशिवाय राहतात. फिरतात, सगळी कामे करतात आणि तुम्ही फक्त पुस्तकातलं वाचून परीक्षेला लिहून काढता. मग तुम्ही हुशार कसे? तुमच्यापेक्षा आम्हीच हुशार नाही का?”
एवढं बोलून चिऊताई जागेवर बसली. सर्व मुले विचारात पडली. स्वतः राणीदेखील चकीत झाली. खरंच एवढीशी, छोटीशी चिमणी स्वतःची सर्व कामे करते आणि मी एवढी मोठी होऊनही अजून आई-बाबांवर, शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यादिवशी राणी आणि वर्गातल्या सर्व मुलांनी मनाशी ठरवले. यापुढे स्वतःची कामे स्वतःच करायची!