- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
उमेश कामतने नाटकात, मालिकेमध्ये, चित्रपटामध्ये अभिनयाची मुशाफिरी केलेली आहे. ‘अलिबाबा आणि चाळिशीतील चोर’ हा त्यांचा चित्रपट आलेला आहे. प्रेक्षकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत.
उमेश कामतचे शालेय शिक्षण बीपीएम स्कूल, खार येथे झाले. त्याचा भाऊ व्यावसायिक नाटकात काम करत होता. जेव्हा तो पाचवीत होता, तेव्हा त्याची रिप्लेसमेंट उमेशने केली होती. सुरुवातीला व्यवसायिक नाटकात त्याने कामे केली आणि त्यानंतर एकांकिकेमधून तो कामे करू लागला. त्यानंतर त्याने रूपारेल कॉलेजमधून कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केले. पोस्ट ग्रॅज्युएशन पोद्दार कॉलेजमधून केले. आंतर महाविद्यालय एकांकिका स्पर्धेत त्याने कामे केली. पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याने वामन केंद्रे दिग्दर्शित ‘रणांगण’ नाटकात रिप्लेसमेंटचे काम केले. त्यानंतर ‘आभाळमाया’ या मालिकेत त्याने काम केले. या मालिकेमध्ये बंटी ही व्यक्तिरेखा साकारली होती. संजय मोने व शैला सावंत यांनी दत्तक घेतलेल्या मुलाची ती भूमिका होती. मुक्ता बर्वेंनी त्याच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती. छोटा बंटी या नावाने त्याला सगळे ओळखू लागले होते. ही मालिका त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यानंतर या ‘गोजिरवाण्या घरात’, ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ यामध्ये देखील कामे केली.
आदित्य इंगळे या दिग्दर्शकाचा उमेशला फोन आला होता की, तो ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ हा चित्रपट करीत आहे व त्यात त्याला भूमिका करायची आहे. या अगोदर या नावाचे नाटक त्याला माहीत होते. या चित्रपटामध्ये अभिषेक नावाची व्यक्तिरेखा तो साकारित आहे. चाळीस वय झाल्यानंतर प्रत्येकाला जीवनात अनुभव आलेला असतो. प्रत्येकाच्या मनात एक चोर असतो.
एखादी अनपेक्षित घटना घडल्यानंतर आपल्या नातेसंबंधावर त्याचा काय परिणाम होतो, मित्रत्वाच्या नात्यात काही बदल होतो का? मित्राची चूक आपण समजून घेतो का? प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं. आपल्या मनातल्या चोराला खतपाणी घालून मोठ करायचं का? संबंधामधून निर्माण होणाऱ्या प्रश्नाची उतरे शोधून ती स्वीकारून समाधानकारक आयुष्य जगायचं हे सारं काही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अनेक मुद्द्यांचा ऊहापोह या चित्रपटात केलेला आहे.
या चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्यसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? असे विचारल्यावर उमेश म्हणाला की, त्याच्या सोबत काम करण्याचा अप्रतिम अनुभव होता. त्याच्या सोबत अजून एक मी चित्रपट केला आहे. लेखकाची भाषा समजून अभिनय करणं तसं कठीण काम असतं; परंतु आदित्य होता, त्यामुळे मला ते सोपे गेलं. कोणाच्या काही सूचना असतील, तर योग्य असल्यास तो त्या स्वीकारतो. चांगली कलाकृती तयार करण्यासाठी तो सतत धडपडत असतो. इतर सगळे चांगले कलाकार असल्यामुळे हा चित्रपट चांगला झालेला आहे.
सध्या ‘जर तर ची गोष्ट’ हे त्याच नाटक सुरू आहे. या नाटकाचा शंभरावा प्रयोग लवकरच होणार आहे. सोनाली खरे. सोबत त्याचा ‘माय लेक’ हा चित्रपट येणार आहे. आदित्य इंगळे दिग्दर्शित अजून एक त्याचा चित्रपट येणार आहे. ‘अलिबाबा आणि चाळिशीतले चोर’ या चित्रपटासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्याला हार्दिक शुभेच्छा!