Thursday, June 11, 2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, राज्यभर तीव्र निषेध

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्न अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, राज्यभर तीव्र निषेध

Chhatrapati Sambhajinagar : बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासन (FDA) पथकावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना ९ जून रोजी गंगापूर तालुक्यातील रहिमतपूर येथे मध्यरात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सहायक आयुक्त विवेक पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे, मो. फरीद सिद्दीकी आणि नमुना सहायक अमोल कांबळे हे पथक कारवाईसाठी घटनास्थळी गेले होते. कारवाईदरम्यान आरोपींनी शासकीय कामात अडथळा आणत अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न केला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनेच्या गंभीर स्वरूपामुळे मोठा अनर्थ टळला.या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अन्न अधिकारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने राज्यभर काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला. “शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर झालेला हा थेट हल्ला असून अशा प्रवृत्तीमुळे मनोबल खच्ची होते,” अशी प्रतिक्रिया संघटनेने दिली.

राज्यातील अन्न सुरक्षा अधिकारी अपुऱ्या संसाधनांमध्येही प्रतिबंधित अन्न पदार्थांविरोधात सातत्याने कारवाई करत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.घटनेची दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे (भाप्रसे) यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली व दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याचे धाडस करणाऱ्यांविरुद्ध कठोर व 'उदाहरणात्मक' कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये कायद्याचा वचक निर्माण होईल आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी स्पष्ट भूमिका प्रशासकीय वर्तुळातून घेतली जात आहे.

संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ राम मुंडे
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा