जगू कशी तुझ्याविना…
श्वास श्वास कोंडताना
साद न येई हाकेला
दूर जाता कलेवर
हुंदकाही अडलेला…
हात तुझा हातातला
सोडवेना सख्या मला
सनईच्या सूरातली
शांत झाली रागमाला…
दर्दभऱ्या एकांताच्या
राती कितीक झेलल्या
ओघळत्या आसवांनी
माझ्या पापण्या गोठल्या…
मुकपणा विरलेले
शब्द होते सोबतीला
उजागर झुल्यावर
पीळ बसतो मनाला…
सांगूनिया जा मजसी
असा काय माझा गुन्हा
परतीच्या पावलांनी
रंग भरावे तू पुन्हा…
संकटाच्या वादळाचा
ढग अंगावर आला
जगू कशी तुझ्याविना
पूर अश्रूंचा वाहिला…
– पूजा काळे, बोरिवली
वसंतोत्सव
नवचैतन्ये वसंत नटला
तरुवेलींचा सुगंध सुटला ||धृ||
बहावा तरी सुंदर सजला
पर्णपाचुतुनी.बहरु लागला
पीतफुलांनी डोलत सुटला
पांथस्थांना सुखवु लागला ||१||
गुलमोहराच्या पायघड्यांनी
रस्ता सारा मखमली बनला
रक्तवर्ण हा तळपू लागला
ग्रीष्मासंगे फुलून आला ||२||
पळस,पांगिरा फुलांनी नटला
हिरव्या कोंदणी ठसा उमटला
मनासी वेधत खुलवू लागला
संगतीने ग्रीष्मात हरवला ||३||
आम्रतरुही मोहोरुनी गेला
कैरीफळांचे तोरण ल्याला
कोकिळ कूजनी रंगुन गेला
आमराईचे भूषण बनला ||४||
– दीप्ती कोदंड-कुलकर्णी, कोल्हापूर.