Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजPoems : काव्यरंग

Poems : काव्यरंग

अभिमान मराठी

उत्तुंगतेचे शिखर गाठले
सह्याद्रीने तट राखले
अरबीच्या उसळती लाटा
गड, किल्ल्यांनी वैभव जपले

या मातीचा सुगंध जगवा
शान आमुची फडकता भगवा
वीर आणि पराक्रमाची
ऐतिहासिकता संगे भगवा

मना मनातून जगतो शिवाजी
पाठराखीला लढतो संभाजी
बलिदानाचे हे तेज वाहतो
अभिमानाचा शिरपेच धारतो
माणिक मोती येथे पिकाती
संस्काराचे धडे गिरवती
सीमापार गाजे याची महती
अभेद्य आहे मराठी कीर्ती

जन्म लाभला या धरीवर
अभिमान जगाला शुरविरांवर
ओठात मधाळ बोलतो मराठी
हे भाग्य लाभले जन्मलो मराठी
– राजश्री बोहरा

माझी माय मराठी

माझी माय मराठी
अभिमाने येते ओठी ||धृ।।
कवितेसह हर्षे येते
भारूड, गवळण गाते
पोवाड्यांतुनी ही रमते
ओव्यांमधुनी ती सजते ||१||

विश्वात कथेच्या फुलते
शब्दालंकारे खुलते
वास्तवास न्याय ही देते
आविष्कारातुनी नटते ||२||

कधी कादंबरी ही बनते
अन् शब्दांसह डोलते
भेदक, वेधक ती ठरते
सकलांना काबिज करते ||३||

लालित्ये ही मांडते
संवादांनी उलगडते
तेजोन्मेषे नि पांडित्ये
मोहिनी जणू घालिते ।।४।।

सारस्वतासी जी स्फुरते
नाट्यातुनी ही प्रगटते
नवरसातुनी दर्शविते
विश्वाला स्पर्श ही करते ||५||

– दीप्ती कोदंड कुलकर्णी, कोल्हापूर

ऋणानुबंध

आभाळ जेव्हा कडाडून भांडतं
तेव्हाच त्यातून
पाणी सांडतं

झाड बहरून छत्री खोलतं
तेंव्हाच त्याला हे ऊन पेलतं

वारा उनाड
सैर-भैर होतो
तेव्हाच सुंई सुंई
गाणे गातो

सूर्य तापून होतो लाल
तेव्हाच फुलांचे सुकतात गाल

माती भिजून होते गाळ
तेव्हाच त्यातून
पिकते साळ

जेव्हा तेव्हाचा ऋणानुबंध
घ्या आनंद नि
लिहा निबंध

– भानुदास धोत्रे, परभणी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -