Maratha community : इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल

  109

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास


मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षण अहवाल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द


विक्रमी वेळेत, अहोरात्र काम करून सर्वेक्षण पूर्ण केल्याबद्दल कौतुक


मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे (Maratha community) मागासलेपण तपासण्यासाठी (maratha reservation) राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला.


यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. वर्षा निवासस्थानी आज सकाळी हा अहवाल सुपूर्द करतेवेळी आयोगाचे सदस्यदेखील उपस्थित होते. यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अशा साडेतीन ते चार लाख अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून राज्यात युद्धपातळीवर मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २ फेब्रुवारी रोजी पूर्ण करण्यात आले. राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकामी गोखले इन्स्टिट्यूट, आयआयपीएस या नामांकित संस्थेची मदत झाली. विशेष अशा सॉफ्टवेअर प्रणालीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.



मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक गावात दवंडी पिटवून सर्वेक्षणास नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले होते, त्यामुळे हे सर्वेक्षण अत्यंत जलदगतीने पार पडले.


या कामकाजाकरिता राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगर पालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते. तसेच राज्यातील जमीन अधिग्रहण, जमीन धारणा, जमाबंदी, भूमी अभिलेख, तसेच शासकीय व निमशासकीय नोकरीमध्ये समाजाचे प्रमाण व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाण इत्यादी बाबींची प्रत्यक्ष माहिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सर्व विभागांच्या सचिवांनी आयोगाला माहिती उपलब्ध करून दिली. तसेच शारीरिक कष्ट करणाऱ्या कामगारांची माहितीसुद्धा आयोगास उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त राज्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा तरुणांच्या आत्महत्यांविषयीचीसुद्धा माहिती आयोगास उपलब्ध करून देण्यात आली.



कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही


यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्ग आयोगाला सांगितले होते. साडेतीन ते चार लाख लोक यासाठी दिवसरात्र काम करीत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले, मात्र दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नव्हते. आज सादर करण्यात आलेला अहवाल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर चर्चा होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अगदी पहिल्यापासून आम्ही सकारात्मक असून तशी पावले वेळोवेळी उचलली आहेत. आयोगाने विक्रमी वेळेत सर्वेक्षण पूर्ण केले असून मला विश्वास वाटतो की, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न बसता आम्हाला देता येईल.



आंदोलन मागे घेण्याचे आवाहन


मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेवर आल्यापासून अनेक ठोस पावले उचलली आहे. आयोगाने आज विक्रमी वेळेत आपला अहवालही सादर केला आहे. २० फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशनदेखील आम्ही बोलाविले आहे. हे सर्व पाहता आपले आंदोलन आंदोलनकर्त्यांनी मागे घ्यावे असे आवाहनदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.


आज अहवाल देतेवेळी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, आयोगाचे सदस्य अंबादास मोहिते, ओमप्रकाश जाधव, मच्छिंद्रनाथ तांबे, ज्योतिराम चव्हाण, मारुती शिंकारे, डॉ गोविंद काळे, डॉ. गजानन खराटे, नीलिमा सरप (लखाडे), सदस्य सचिव आ. उ. पाटील आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

नागपूर - पुणे वंदे भारत या दिवसापासून धावणार

नागपूर : नागपूर (अजनी) ते पुणे आणि पुणे ते नागपूर (अजनी) अशी वंदे भारत एक्सप्रेस रविवार १० ऑगस्ट २०२५ पासून धावणार

एसटी महामंडळाच्या राखी पौर्णिमेसाठी ४० जादा गाड्या कार्यरत

लाडक्या बहिणींसाठी ८, ९ आणि ११ ऑगस्ट रोजी बसची विशेष सेवा पेण(स्वप्नील पाटील) : आधीच लाडक्या बहिणींना एसटी

राज्यातील ५ ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

नियमितपणे आढावा, समन्वय साधणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई : राज्यातील पाच

माधुरी लवकरच कोल्हापूरला परतणार!

कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश; माधुरीला परत पाठवण्याबाबत वनताराकडून आश्वासन कोल्हापूर: कोल्हापूरकरांच्या

उत्तराखंडमधील ढगफुटीत अडकले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक

सर्व पर्यटक सुखरूप असल्याची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती मुंबई : उत्तराखंडमधील राज्यातील उत्तरकाशी

Hingoli Train Fire : हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या बोगीला भीषण आग; संपूर्ण बोगी जळून खाक

हिंगोली : हिंगोली शहरातील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या एका जुन्या बोगीला बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी सुमारे ८:३०