Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येणार सोलापुरात; कारणही आहे...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येणार सोलापुरात; कारणही आहे खास!

पंतप्रधानांचा आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक विकासकामांचे उद्घाटन तसेच काळाराम मंदिरात दर्शन, गोदावरीची आरती अशा अनेक गोष्टींमुळे त्यांनी महाराष्ट्राचे मन पुन्हा एकदा जिंकले. यानंतर पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्याला कारणही खास आहे. ३० हजार कामगारांचे स्वप्न पूर्ण करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प सोलापुरातील रे नगर (Solapur News) येथे उभा राहणार आहे. याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १०:४५ वाजता पंतप्रधान सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांसह ३ हजार पोलीस आज सोलापुरात तैनात असणार आहेत. यात दोन विशेष पोलीस महानिरीक्षक, १० पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त, २९० पोलीस निरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक, २ हजार महिला आणि पुरूष पोलीस कर्मचारी, १०८ एसपीजी कमांडो तैनात असणार आहेत. सभेला येताना मोठ्या बॅग, झेंडे, बॅनर्स, घोषवाक्य फलक, पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थ, विडी सिगरेट, तंबाखूजन्य पदार्थ, इ. सभास्थळी आणण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत सोलापूरमध्ये

कामगारांचे शहर (Labour city) अशी सोलापूरची ओळख आहे. आधी सूतगिरणीमध्ये काम करणारे आता वस्त्रोद्योग, विडी उद्योग, बांधकाम अशा विविध क्षेत्रात हजारो कामगार सोलापुरात काम करत असतात. गरीबीमुळे या कामगारांना मोडक्या तोडक्या घरांमध्ये राहण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, या कामगारांचं स्वतःचं हक्काच्या घराचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत (Labour colony) सोलापुरातल्या रे नगर येथे साकारली जात आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः सोलापूरला येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ जानेवारी २०१९ रोजी या प्रकल्पाचे शिलान्यास केले. जवळपास पाच वर्षानी पुन्हा मोदी आपला शब्द पूर्ण करण्यासाठी सोलापुरात येणार आहेत. आयुष्यभर झोपडपट्टीत जगणाऱ्या कामगारांना देखील स्वतःचं हक्काचं घर असावं, याच उद्दिष्टाने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे साकारली आहेत. सलग ४ वर्षे जवळपास १० हजार कामगारांनी मिळून रे नगरमध्ये हा भव्य प्रकल्प साकारला आहे. मागील दहा वर्षे केलेल्या नरसय्या आडम यांच्या प्रयत्नांना राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीमुळे मूर्त स्वरूप आले आहे. केवळ डोक्यावर छत नाही तर जगण्यासाठीच्या मूलभूत सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

नेमकी कशी आहे ही वसाहत?

३५० एकर परिसर, ८३४ इमारती, प्रत्येक इमारतीत ३६ असे एकूण ३० हजार फ्लॅट्स असणारी ही देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. यासाठी एकूण ६० मेगावॅट विजेचे प्रकल्प काम सुरु, पैकी २० मेगावॅटचे काम पूर्ण झाले आहे. परिसरात ७ मोठ्या पाण्यच्या टाक्या ठेवण्यात येणार असल्याने २४ तास पाणी पुरवठा शक्य होणार आहे. परिसरात मलशुद्धीकरण केंद्र व स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडीची सोय, खेळण्यासाठी क्रीडा मैदान, आरोग्यासाठी हॉस्पिटल, लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय देखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पंतप्रधान मोदींचा आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे १०:४५ वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी २:४५ च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी ६ वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२३च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -