उमेश कुलकर्णी
आंतरराष्ट्रीय संघर्षाने भरलेले वर्ष आता आपला निरोप घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. वर्ष २०२३ संपून आता आपण लवकरच २०२४ चे स्वागत करण्यास सज्ज झालो आहोत. पण २०२३ वर्ष अनेक आंतरराष्ट्रीय संघर्षांच्या कटू स्मृती ठेवून जात आहे. काही जण म्हणतात की, जग आता तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. पण जेव्हा २०२३चा विचार करू लागतो तेव्हा असे लक्षात येते की, वर्ष जेव्हा आंतरराष्ट्रीय संघर्षाचा विचार करते तेव्हा अत्यंत गतिमान आणि विविध घडामोडींनी भरलेले होते. आपण जेव्हा २०२३ मध्ये प्रवेश केला तेव्हा आपण रशिया-युक्रेन युद्धाच्या संपूर्ण पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आलो होतो. पण आता आणखी आंतरराष्ट्रीय संघर्ष पेटलेले आहेत आणि २०२४ मध्ये काय होईल, याचा आपल्याला पत्ता नाही. आता जेव्हा हे वर्ष संपत आले आहे तेव्हा तीन प्रमुख आंतरराष्ट्रीय घटनांचा आढावा आपण घेणार आहोत, ज्या संघर्षाचा कधीही स्फोट होईल, अशी स्थिती आहे. सर्वात प्रथम इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाचा विचार येतोच. नंतर येते रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध आणि नंतर इथिओपियातील संघर्ष. पण पश्चिम आशियातील संघर्षाने हे वर्ष गाजवले आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे हे केवळ एक भूराजकीय धड्यापेक्षा खूप काही अधिक होते.
इस्रायल-हमास युद्ध : इस्रायल आणि पॅलेस्टाईन पेच अनेक वर्षांपासून सुरू आहे. या वर्षी तर त्याला आणखी काही नवीन पैलू येऊन मिळणार आहेत. या संघर्षाचा इतिहास खूप जुना आहे. जेरूसलेम ही ख्रिश्चन आणि मुस्लीम तसेच यहुदी या तिघांसाठीही वंदनीय भूमी आहे. कारण त्या तिन्ही धर्माचे प्रणेते याच भूमीत जन्मलेले आहेत. त्यामुळे कोणतेही धर्म ही जागा सोडण्यास तयार होणार नाही. किरकोळ संघर्ष तर सुरूच होते. पण दोन्ही संघर्षरत शेजारी देशांमधील वातावरण बरेचसे सुरळीत सुरू होते. पण हमास या अतिरेकी संघटनेला इस्रायल हा लहानसा देश आंतरराष्ट्रीय लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहे, हे हमासला रूचले नाही. त्यामुळे त्यांनी इस्रायलमध्ये योम किप्पूरचा उत्सव साजरा करण्यात इस्रायली दंग झाले असताना घुसखोरी केली आणि इस्रायलींना ठार मारले. कित्येकांना पळवून नेले, त्यांना ओलिस ठेवले. सारे जग त्यामुळे पेटून उठले आणि हमासविरोधात आंतरराष्ट्रीय जगाने संताप व्यक्त केला. अर्थात हमासची बाजू घेणारेही बरेच होते आणि त्यात इराणसारखा देश सामील होता.
७ ऑक्टोबरला हमासने केलेला हल्ला इतका पाशवी होता की, त्यात १४०० इस्रायली ठार झाले. नंतर अर्थातच इस्रायलने हमासला संपवण्याचे ठरवून टाकले आणि हमासवर म्हणजे त्यांना आसरा देणाऱ्या गाझा पट्टीला बेचिराख केले. आजही त्या परिसरातून ज्वाळा उठलेल्या दिसतात. इस्रायलने आपल्या पद्धतीने हमासच्या हल्ल्याचा सूड घेतला. संपूर्ण गाझा पट्टीचे रूपांतर एका मोठ्या स्मशानात करण्यात आले. त्यात २० हजार पॅलेस्टिनींची आहुती पडली. त्यात ४० ते ५० टक्के महिला होत्या. या युद्धाने जगात दोन फळ्या पडल्या आणि इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका ही राष्ट्रे एकीकडे तर दुसरीकडे अरब राष्ट्रे आणि इराण अशी फळी होती. आजही युद्ध सुरूच आहे आणि मध्य आशियाचा प्रांत संपूर्ण अशांत आहे. तेथे मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना दोन्ही बाजूंनी घडल्या आहेत. भारताने इस्रायलची बाजू घेतली आहे आणि इतके लहान राष्ट्र साऱ्या अरब राष्ट्रांना पुरून उरले कसे, याचा अंचबा सारे जग करत आहे. या संघर्षावर भारतातही अनेक राजकीय मतभेद निर्माण झाले आणि अचानक गाझा पट्टीतील नागरिकांबद्दल अनेक देशांना आणि देशातील राजकीय पक्षांना ममत्व वाटू लागले. त्यामुळे भारतावर ज्या युद्धाचा खऱ्या अर्थाने परिणाम झाला ते हेच युद्ध होय.
रशिया-युक्रेन युद्ध : २०२२ साली रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले असले तरीही त्याची खरी परिणती २०२३ मध्येच झालेली दिसली. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने आंतरराष्ट्रीय जगताला वेढून टाकले. त्यामुळे जागतिक मंदी आणखीच गडद झाली. अनेक वस्तूंची टंचाई निर्माण झाली. आज पोलादाची टंचाई आहे. ही देणगी याच युद्धाची आहे. युक्रेनला ‘नाटो’ राष्ट्रामध्ये सामील व्हायचे आहे आणि त्यासाठी अमेरिका तयार नाही. त्यामुळे अमेरिकेने युक्रेनला अनेक प्रकारे मदत केली. पण रशिया आणि युक्रेन यांच्यात आजही सातत्याने संघर्ष सुरू आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासाठी हे युद्ध प्रतिष्ठेचे ठरले आहे. युक्रेनला वाटले त्यापेक्षा जास्त काळ संघर्ष केला आणि आजही तो युद्धास ठाम आहे. इस्रायल-हमास युद्धाने युक्रेनला लाभ असा झाला की, जगाचे लक्ष त्या नव्या संघर्षावर केंद्रीत झाले. पण त्याचवेळी पाश्चात्त्य राष्ट्रे जी युक्रेनला आर्थिक मदत करत होती, त्यांचे लक्ष इस्रायल आणि हमासकडे गेल्याने युक्रेनला मिळणारी मदत बंद झाली. आर्थिक लष्करी मदत बंद झाली आणि ती मदत आता गाझा पट्टीला मिळू लागली आहे. युक्रेनच्या चिवटपणामुळे पाश्चात्त्य जगही थकून गेले आहे आणि हे युद्ध संपण्याची ते कधी नव्हे इतकी वाट पाहत आहेत.
नागार्नो आणि काराबाख यांच्यातील युद्धाचा आपल्याकडे जास्त परिणाम झाला नसला तरीही त्यामुळे आंतरराष्ट्रीय जगावर परिणाम झालेच आहेत. नागार्नो काराबाख हा वादग्रस्त प्रदेश आहे. त्या मुद्द्यावर आर्मिनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्ष कितीतरी वर्षांपासून सुरू आहे. रशिया आणि तुर्की यांचा पाठिंबा असलेल्या अझरबैजानने या प्रदेशावर आपला ताबा ठेवला होता. अझरबैजान सीमेवर परिस्थिती चिंताजनक आणि नाजूक आहे. कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. पण त्या भागातील युद्धाचा भारतावर परिणाम होणार नाही, हा दिलासा आहे.
व्हेनेझुएला-गयाना संघर्ष : व्हेनेझुएला आणि गयाना यांच्यातील संघर्ष याच वर्षात पेटला होता आणि अजूनही तो मिटलेला नाही. अमेरिका जगभरातील संघर्ष हाताळण्याचा दावा करत असली तरीही तिला वाटते ती तितकी सुरक्षित नाही. एस्से क्वीबो हा प्रांत वादग्रस्त असून त्या प्रांतावर कब्जा करण्याची इच्छा निकोलस माडुरो यांनी बोलून दाखवली आहे. २०२३ मध्ये घडलेल्या आणि २०२४ मध्ये पुढची पायरी गाठण्याची शक्यता असलेल्या संघर्षाची हा थोडक्यात आढावा आहे.