दुबई: आयपीएल २०२४साठी(Ipl 2024) १९ डिसेंबरला दुबईच्या कोका कोला स्टेडियममध्ये लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. हा एक मिनी लिलाव होतो. मात्र यात लिलावात जुन्या लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडले. आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदा २० कोटीहून अधिक रूपयांची बोली लागली. या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा राहिला. या खेळाडूंना सर्वाधिक किंमतीला खरेदी करण्यात आले. जाणून घेऊया या लिलावातील सर्वात महागड्या ५ खेळाडूंबद्दल…
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मिळाले सर्वाधिक पैसे
आयपीएल २०२४ साठी झालेल्या या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मिचेल स्टार्कला २४.७५ कोटी रूपयांना खरेदी केले. ही या हंगामातील आणि आतापर्यंतच्या सर्व आयपीएल हंगामातील सर्वात महागडी खरेदी आहे.
याशिवाय या लिलावात मिचेल स्टार्कच्या आधी पॅट कमिन्सचने नाव आले होते. यासाठी चेन्नई सुपर किंग्सपासून ते मुंबई इंडियन्स नंतर आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात जोरदार स्पर्धा रंगली होती. मात्र अखेरीस सनरायजर्स हैदराबादने या खेळाडूला २०.५० कोटी रूपये देत आपल्या संघात सामील केले.
या दोघा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनंतर आयपीएल २०२४च्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू डॅरिल मिचेल ठरला. न्यूझीलंडच्या या ऑलराऊंडरला चेन्नई सुपर किंग्सने १४ कोटींची बोली लावत खरेदी केले.
भारतीय खेळाडू चौथ्या स्थानावर
या तीन खेळाडूनंतर सगळ्यात महागड्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर भारतीय खेळाडूचे नाव येते. भारताच्या हर्षल पटेलला पंजाब किंग्सने ११.७५ कोटी रूपयांना खरेदी करत आपल्या संघात सामील केले. हा आयपीएलच्या लिलावातील सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू आहे.
या यादीत पाचवा सगळ्यात महाग खेळाडू वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्जारी जोसेफ आहे. त्याला आरसीबीने ११.५० कोटी देत खरेदी केले.