दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमात एक यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक निलेश भगवान सांबरे यांनी हजेरी लावली. यांनी आपल्या जीवनातील काही आठवणी सांगितल्या. यावेळी दैनिक प्रहारच्या वतीने लेखा, प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत आणि संपादक डाॅ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. निलेश सांबरे हे एक यशस्वी उद्योजक असले तरी आज त्यांनी पालघर, ठाणे, विक्रमगड, मोखाडा, जव्हार या जिल्ह्यांमध्ये आपल्या सामाजिक कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या गरिबीतूनही, स्व-कष्टातून उभा केलेला व्यवसाय टिकवून, त्यातूनच मिळणाऱ्या स्व-कमाईचा भाग समाजकार्यासाठी वापरला आणि एक नवा आदर्श घालून दिला.
तेजस वाघमारे
महाराष्ट्र ही साधू-संत आणि महापुरुषांची भूमी. महापुरुषांच्या विचारांचा आणि कृतीचा उदोउदो सुरू असताना त्यांचा वारसा चालविणारे सद्पुरुष क्वचित आढळतात. त्यापैकी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे नाव घेता येईल. आपल्या व्यवसायातील उत्पन्नामधून सांबरे समाजातील उपेक्षित घटकांना आणि गरजूंना मदत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आई-वडील नसणाऱ्या मुलांपासून शिकण्याची जिद्द उरी बाळगलेल्या तरुणांना सांबरे मदतीचा हात देऊन त्यांचे आयुष्य बदलवून टाकत आहेत. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर आणि माजी सनदी अधिकारी निर्मलकुमार देशमुख यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व क्षेत्रात अधिकारी बनविण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले आहे. आयएएस, आयपीएस, वैद्यकीय ते आयआयटी शिक्षणासाठी मदत करून सांबरे यांनी अनेक अधिकारी घडवले आहेत. राज्यातील लोकांनी नोकरीऐवजी व्यवसाय करावा, यासाठी ते आग्रही आहेत. निलेश सांबरे यांचे कार्य थक्क करणारे आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये जिजाऊ संस्थेचे विविध विषयांवर काम सुरू आहे. सामाजिक, शैक्षणिक, रोजगार, आरोग्य क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय ठरलेय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचार-कार्याने प्रेरित होऊन सांबरे यांनी सीबीएससीच्या शाळा उभारून शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. आदिवासी तालुक्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, पालघर येथून दरवर्षी ४० विद्यार्थी आयआयटीला गेले पाहिजेत. ४० विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गेले पाहिजेत. ४० विद्यार्थी अधिकारी झाले पाहिजेत, हे जिजाऊ संस्थेचे स्वप्न असल्याचे ते सांगतात. प्रामाणिकपणे काम केल्यास त्याला यश मिळत असतेच. आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केला पाहिजे. आम्ही गावोगावच्या शेतकऱ्यांना सांगतो की, कुणी एक एकर काय, एक फुटही जागा विकू नका. कुणी दमबाजी करून जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्यास जिजाऊ संस्थेकडे यावे, असे आवाहन ते करतात. भिवंडीमधील उदाहरण देत ते स्थानिकांना कामगारांऐवजी गोडाऊनचे मालक व्हा, असा सल्ला देतात. केवळ सल्ला देऊन न थांबता ते कृतीलाही लागले आहेत.
कोकण हा मुंबई लगत असल्याने या भागात दुग्ध व्यवसाय, भात शेती, फळ-फूल शेती, कुक्कुटपालन, बकरी पालन असे पूरक शेतीला जोड व्यवसाय करण्यासाठी त्यांनी प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होईल, असा त्यांना विश्वास आहे. पालघरच्या कापड गिरण्या आता सुरतमध्ये गेल्या आहेत.
सुरत आता मुंबईच्या पुढे गेले आहे. तेथील लोक म्हणतात, आम्ही रविवार सोडून कधीच आराम करत नाही. एक दिवस फक्त कुटुंबाला देतात. आपल्याकडे पाहिल्यास नागरिकांकडे ७० टक्के वेळ हा रिकामा असतो. कामावर असतानाही लोक प्रामाणिकपणे काम करत नाहीत. देशासाठी काम करायचे झाल्यास प्रत्येकाला प्रामाणिकपणे काम करावे लागेल. स्वातंत्र्य मिळाल्यापासून महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता. आज शिक्षण, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात काय परिस्थिती आहे? हे आपणास माहीत आहेच, अशी खंत सांबरे यांनी यावेळी व्यक्त केली.
जगाला प्रेम अर्पावे…
विनिशा धामणकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.’ बाबासाहेबांचे हे शब्द आदिवासी, मागास आणि वंचित समाजासाठी फार जिव्हाळ्याचे आहेत. कारण ‘शिक्षण’च त्यांना सामाजिक न्याय मिळवून देऊन मुख्य प्रवाहात आणू शकते याची त्यांना खात्री असते. याची जाणीव एका तरुणाला करून दिली ती त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पीडितांच्या, व्यवस्थेच्या माराने पिचलेल्या वंचितांच्या परिस्थितीने. त्यावेळी बाबासाहेबांचे हे बोलच त्यांच्या आयुष्याचा ध्यास बनले. पालघरसारख्या आंधळ्या-मुक्यांचा प्रदेश म्हणून हिणवल्या गेलेल्या छोट्याशा जिल्ह्यातील या लोकांना त्यांच्या रौरवातून बाहेर काढण्यासाठी शिक्षण हेच शस्त्र असू शकतं हे त्याने जाणलं आणि शिक्षणाची गंगा आपल्याच नाही तर शेकडो आदिवासी, मागास आणि वंचित समाजातील मुलांच्या घरात आणून सोडण्याचा निर्धार करून तो प्रत्यक्षात आणला. एक बीज रोवले त्याची आज वनराई फुलली आहे. अनेकांच्या आयुष्यात ध्येय पेरून ती पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे निलेश सांबरे. प्रहार गजालीच्या कार्यक्रमात त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवलं की जगात फक्त विशिष्ट पदाच्या, अधिकाराच्या आणि पैशाच्या जोरावर जनतेचे मसीहा असल्याचा आव आणणारेच नाहीत, तर जनतेत वावरून त्यांचे प्रश्न मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न करणारे निलेश सांबरेंसारखे लोक सुद्धा आहेत. त्यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांच्या जीवनात आनंद पेरला आहे. असे दोन चार लोक जरी या देशात निर्माण झाले तर इथे नंदनवन फुलायला फार वेळ लागणार नाही.
निलेश सांबरे यांनी आपल्या आयुष्यात आवाजविहीन माणसं जशी पाहिली तशीच प्रचंड भ्रष्ट अधिकारी सुद्धा पाहिले. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गरजांपेक्षा जास्तीची भूक माणसात निर्माण झाली की, तो इतरांच्या वाट्याचं सुद्धा दोन्ही हाताने ओरबाडून घेऊ लागतो. अशा भ्रष्ट माणसांमुळेच गरजवंतांपासून ‘जगणं’ दूर राहतं. त्यांना जर चांगलं जीवन द्यायचं असेल तर त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या जागी प्रामाणिक आणि लोकांच्या प्रश्नांची कळकळ असणारे अधिकारी बसले पाहिजेत. असे अधिकारी तयार करणं हेच निलेश सांबरे यांच्या आयुष्याचं ध्येय बनलं आहे. इथे सुद्धा ‘मोक्याच्या ठिकाणी प्रामाणिक माणसं असतील तरच सर्वात शेवटच्या माणसाला प्रगती साधता येईल,’ हे डॉ. बाबासाहेबांचे विचार त्यांच्या कार्याला भक्कम करतात. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असं आपल्या सरदारांना बजावून सांगणाऱ्या रयतेचा राजा शिवरायांना आदर्श मानणारे निलेश सांबरे आपल्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हेच सांगतात.
आज विक्रमगड, मोखाडा, जव्हार, शहापूर, भिवंडी, या तालुक्यांसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, अभ्यासिका, पोलीस अॅकॅडमीज, यूपीएससी, एमपीएससी मार्गदर्शन केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र असे अनेक सेवाभावी उपक्रम राबवले जातात. बऱ्याच अंशी त्यांनी आपला उद्देश साध्यही केला, असला तरी अजून घोडदौड सुरू आहे. ‘जगाला प्रेम अर्पावे’ हे तुकडोजी महाराजांचे शब्द आपल्या स्वभावात उतरवणाऱ्या निलेश सांबरे यांना त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
स्व’कष्टातून निवडली विकासाची वाट
वैष्णवी भोगले
काही वर्षांपूर्वी कोणालाही माहीत नसलेले नाव आज रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्येकाच्या मनात ठसले आहे, ते म्हणजे निलेश सांबरे. त्यांची ओळख नावावरून न होता प्रामाणिक, नि:स्वार्थीपणे केलेल्या कार्यातून होते. सामान्य कुटुंबामध्ये राहणारे निलेश सांबरे हे अत्यंत हुशार, जिद्दी, मितभाषी, अभ्यासात हुशार होते.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बघितलेले स्वप्न आज सत्यात उतरले आहे. एका शेतकरी मुलाने परिश्रमाच्या जोरावर प्रामाणिकपणाची कास न सोडता स्वत:च्या कष्टातून, जिद्दीने २००८ साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा एक रोप लावले, त्याचा आता एक आधारवड निर्माण झाला आहे. अनेक चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकून व्यवसायाबरोबरच त्यांनी राजकीय, सामाजिक, उद्योजक म्हणून आपला ठसा उमटवला. निलेश सांबरे हे समाजाप्रती असलेल्या आपुलकीमुळे आज अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
आज त्यांनी सुरू केलेल्या जिजाऊ संस्थेचा व्याप बघितला तर तो कल्पनेपलीकडे आहे. गेली १४ वर्षं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कार्यरत आहे. आपण समाजाचे घटक असून गरिबीतून पुढे आलो आहोत, याचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही. आर्थिक कमतरतेमुळे एकही विद्यार्थी वंचित राहू नये तसेच एकही रुग्ण दगावला जाऊ नये, असे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे उद्दिष्ट आहे. या संस्थेच्या उपक्रमातून ५०० हून अधिक अधिकारी तर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी हे खासगी नोकरीस लागले आहेत. या संस्थेतील जास्तीत जास्त विद्यार्थांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देऊन अधिकारी, तलाठी, डॉक्टर, पोलीस बनावेत याकडे त्यांचा कल आहे. या संस्थेद्वारे त्यांनी पालघर जिल्ह्यात दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेमध्ये १०५ आदिवासी दिव्यांग मुले दत्तक घेतली आहेत.
तसेच प्रत्येक रिकाम्या हाताला रोजगार मिळावा यासाठी विद्यार्थांना नर्सिग, मोटार मॅकेनिकल, इलेक्ट्रिशियन, संगणक प्रशिक्षण सुरू केले. महिलांना रोजगार, सक्षम बनविण्यासाठी गृहोउद्योगाच्या माध्यमातून लाखो महिलांना पीठ गिरणी, शिलाई मशीन, पत्रावळी, गारमेन्ट, दागिने, ब्युटी पार्लर, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. समाजातील कोणत्याही नागरिकांवर अन्याय होणार नाही असे जिजाऊ संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यांनी समाजाप्रती केलेल्या अनमोल कामगिरीतून एकच बोध मिळाला तो म्हणजे ‘अथक परिश्रमांची आपण सारे कास धरू, चला सर्वांनी शून्यातून विश्व निर्माण करू’ सुरुवात ही शून्यापासूनच होते.
नि:स्वार्थपणे काम करणारा समाजसेवक
सीमा पवार
निलेश सांबरे हे एक यशस्वी उद्योजक. पण आलेला पैसा हा साठवून ठेवला तर तो सडतो किंवा आपली पुढची पिढी आळशी होते. निलेश सांबरे यांनी नफ्यातून मिळणारा पैसा समाजासाठी कसा वापरता येईल याचा विचार केला. पालघर, ठाणे, विक्रमगड, मोखाडा, जव्हार या ठिकाणी आपल्या समाजकार्याची सुरुवात केली. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह येथील लहान मुले आणि महिलांसाठी कार्य केले. त्यांनी शिक्षण आणि लोकांच्या आरोग्यासाठी केलेली कामे थक्क करणारी आहेत. मी मंदिर किंवा कोणत्याही देवाधर्मासाठी पैसा देत नाही. तर हजारो विद्यार्थांना शिक्षण घेता येईल, अशा शाळा सुरू करून त्यांचे दरवाजे सगळ्यासाठी खुले करायचे असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
त्यांनी गरिबीला व्यसनाची कीड लागते तेव्हा ती कीड मनुष्याचे जीवन कसे पोखरून उद्ध्वस्त करते हे जवळून अनुभवले. त्यामुळे ती कीड लागण्याच्या आधीच गरिबीच्या, त्या विळख्यातूनच बाहेर येऊ पाहणाऱ्या प्रत्येकालाच वर येण्यास आधार देणारे समाजसेवक म्हणजे निलेश सांबरे. वाट्याला आलेल्या गरिबीची पर्वा न करता ते हळूहळू छोट्या-छोट्या उद्योगांतून मोठ्या उद्योग क्षेत्राकडे ते वळले. जिल्ह्याच्या विकासासाठी जिजाऊ फाऊंडेशन संस्था उभी केली. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थी मोठ्या पदापर्यंत कसा पोहोचेल हे स्वप्न पाहत असताना अनेक संकटे, खोटे आरोप झाले. तुरुंगवासही झाला.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील झडपोलीला त्यांचे बालपण गेले. वडील एसटीमध्ये कंडक्टर हाेते. वडिलोपार्जित जमीन होती. आई शेती करायची. पण कोकणात फक्त भात शेती आणि गवत उगवायचे. त्यामुळे उत्पन्नाचे साधन नव्हते. आईबरोबर शेतावर कामावर जायचो. बाबांना दारूचे व्यसन होते. नंतर त्यांनी दारू सोडली. पण गरिबी तर होती. कारण ७ तारखेला आलेला पगार ८ तारखेला संपायचा. नववीला असताना छोटा व्यसाय सुरू केला. आदिवासींची जमीन विकत घेऊन तिथे दगड खदानीचे काम सुरू केले. बारावीनंतर वीटभट्टी सुरू केली. त्यानंतर गावातीलच शाळा दुरुस्ती, विहीर दुरुस्तीची कामे घेतली. २० ते ५० हजारांच्या कामापासून सुरुवात केली. २००४ ते २००५ मध्ये ठाण्याला राहायला आलो. शहरात भाड्याने घर घेतले. व्यवसाय वाढत गेला. काही राजकारणी, नेते, अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलो. अधिकाऱ्यांची ताकद काय असते हे त्यावेळी अनुभवले. त्यानंतर ठरवले की, शिक्षणाने आणि विचाराने मोठे झालेले विद्यार्थी घडवायचे. वर्गणी काढून अनेक संस्था उभ्या राहतात. आदिवासी भागातील लोकांचे वाट्टेल तसे फोटो काढून ते विकून पैसे कमावणारेही लोकही पाहिले. आदिवासी मात्र आजही तेच जीवन जागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श. यांनी केलेले कार्य खूप मोठे होते. याचा एक छोटासा भाग जरी आपण होऊ शकलो तरी आपल्या जगण्याचे सार्थक होईल, असा विचार मनाशी पक्का केला आणि स्वतःला या कार्यात झोकून दिले. २००८ मध्ये जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना केली.
पण हे सर्व करत असताना काम थांबले. २०१३ मध्ये न केलेल्या गुन्ह्यांसाठी ४५ लोकांना अटक करण्यात आली होती. १०७ दिवसांचा तुरुंगवासात अनेक गोष्टी अनुभवल्या. त्यानंतर नातेवाइकांनी, समाजानेही साथ सोडली. ते म्हणतात, केवळ निवडणुकीसाठी जनतेच्या समोर नतमस्तक होणारा लोकनेता व्हायचे नाही. जनतेची नि:स्वार्थपणे सेवा करत जनसेवक म्हणून ओळख निर्माण करायला जास्त आवडेल. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात सीबीएससी बोर्डाच्या आठ शाळा सुरू केल्या. आजही गावाकडच्या शाळांमधील ७ वीच्या विद्यार्थ्यांला धड वाचता येत नाही. पण याचे खापर प्रशासनाच्या माथी न फोडता, स्वतः पुढे यायचे आणि सिंघानिया, अनिल अंबानी असे मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी जे केले आहे ते या जिल्ह्यात करायचे आहे. त्यांना कोकणात प्रत्येक तालुक्यात एक सीबीएससी शाळा सुरू करायची आहे. या शिक्षण संस्थेत केवळ शिक्षकांची फी देऊन मुलांना शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता, युनिफॉर्मपासून शूज, वह्या-पुस्तके सगळे काही शाळा देते. जात-पात-धर्म न मानता प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणायचे आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्यात मोठ्या शाळांपैकी आपली शाळा आज नंबर वन असल्याचा एक अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांच्या शाळेत यूपीएसीचे दहा टॉपर माझे असतील, यासाठी नववीपासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. कोल्हापूरचा स्वप्नील पाटील आयपीएस अधिकारी झाला. सांगलीची नूतन पाटील डेप्युटी कलेक्टर झाली. सोलापूरचा सर्वोदय क्रीडा अधिकारी आहे. आता न्यायाधीशही निर्माण करायचे आहेत. प्रत्येक ठिकाणी जिजाऊमधून अधिकारी तयार झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न आहे.