निसर्गवेद: डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
एके दिवशी मला स्वप्न पडलं. स्वप्नात मी एका झाडाखाली उभे होते आणि माझ्या डोक्यावरून झाडावर बसलेला एक पक्षी हलकाच उडाला. मला तो खूपच जवळून गेल्याचा भास झाला. खूप छान निरीक्षण करता आले. पाहिलं तर मोरासारखा वाटला पण मोरासारखा तर रंग नव्हता. त्याचा रंग राखाडी होता. राखाडी रंगाची मोरपिसांसारखी पिसे होती. सकाळी उठल्यावर तो पक्षी नजरेसमोर भिरभिरू लागला. तेव्हा भारतात संगणक नवीनच आले होते. कॉम्प्युटर ऑन करून त्यावर तो पक्षी शोधण्याचा प्रयत्न करू लागले, पण असं काय लिहावं की तो पक्षी नक्की मिळेल? नाव तर माहीतच नाही. बरं राखाडी मोर असेल, असं काही मनाला वाटत नव्हतं. वर्णनानुसार अनेक नावं लिहून शोधण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ‘ग्रे पिकॉक’ असे लिहिले. खोटं वाटेल तोच पक्षी मला मिळाला. खूप खूप आनंद झाला आणि लगेच त्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. हाच तो राखाडी मोर.
पण हा नक्की कोण? मोर की तितर? हा तर दोन्ही पक्ष्यांचे मिश्रण. खरं तर तितर कुटुंबातील हा पक्षी. यांच्या वंशाचे नाव लॅटिन फेसिअनस फिजंट वरून आले. इंग्रजीत या पक्ष्याला “ग्रे पिकॉक पेजंट” असे म्हटले जाते. यांच्या पंखांवरील नक्षीमुळे यांना मोर म्हटले जाते. यांना बर्मीज मोर-तितर म्हणूनही ओळखतात. हे म्यानमारचे राष्ट्रीय पक्षी आहेत. हे बांगलादेश, म्यानमार, पूर्वोत्तर भारत, दक्षिण-पूर्व एशिया जंगलांमध्ये आढळतात. यांच्या आठ प्रजाती आहेत. राखाडी, हाइनान, जर्मन, कांस्य, शेपटीवाला, मलायन, पलावान आणि बोर्नीयन. यांच्या जाती उपजातींबद्दल आपण नक्की माहिती देऊ शकत नाही तरीही यांच्या उपजातीची वर्णन भूतकाळात केली गेलेली आहेत. त्यात घिगीचा राखाडी मोर-तितर, लोवेचा राखाडी मोर-तितर, उत्तरी राखाडी मोर-तितर असे वर्गीकरण केले आहे. यांची वैविध्यपूर्ण उत्पत्ती किंवा संख्या यावर कोणतीही माहिती आपण नक्की सांगू शकत नाही. यांच्यातला काही प्रजाती पूर्णपणेच नामशेष झाल्या आहेत.
हे उष्णकटिबंधीय पक्षी आहेत. थंडीत यांना ऊबेची गरज असते. हे जंगलात आणि पहाडावर राहणारे पक्षी आहेत. आपल्या नजरेला हे खूप कमी पडतात. गवत, फळ, बिया, वाळवी, कोळी, भाज्या, कीटक, गांडूळ असा सर्व काही आहार या पक्ष्यांचा असतो. यांचे आयुष्य कमीत कमी १५ वर्षे असते. जास्तीत जास्त ७६ सेंमीपर्यंत लांब. राखाडी आणि काळसर नागमोडी रेषायुक्त तपकिरी पार्श्वभूमी, त्यावर निळसर चमकदार इंद्रधनू छटा असणारे डोळे ज्याला पांढरट किनार आहे असे, मोरासारखे लांबट पंख, चेहऱ्याची पांढरी गुलाबी त्वचा, राखाडी पाय व डोळे, राखाडी बारीक पिसांचा मुकुट आणि अंगावरील राखाडी पिसं. अगदी अलंकारिक नक्षीयुक्त तितर तरी मोरासारखा दिसणारा असं एकंदरीतच त्यांचं वर्णन. मादी मात्र नरापेक्षा कमी अलंकृत असते. नराची शेपूट लांब आणि गोल असते, तर मादीची छोटी असते. नर आणि मादी दिसायला जवळजवळ सारखेच असतात. फक्त नरापेक्षा मादी लहान असते. या पक्ष्यांची गंमत म्हणजे हे मादीसाठी पंख पसरवून त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटाच्या पंखांना ते आपल्या चोचीवर ठेवून वाकून नृत्य करतात. मादीचा प्रजनन काळ हा मार्च ते जुलैपर्यंत असतो. ती फक्त दोनच अंडी देते.
या कलाकृतीमध्ये राखाडी मोर तितर कुटुंब दाखवले आहे. हे पक्षी गर्द जंगलामध्ये आपल्या कुटुंबासमवेत शांतपणे नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत. यांच्या पिल्लांच्या रंगांच्या छटा या तपकिरी दिसतात. खरं तर सर्वच पक्ष्यांची पिल्ले ही सुरुवातीला पांढरट पिवळट आणि तपकिरी दिसतात, नंतर त्यांच्या मूळ रंगाच्या छटा त्यावर यायला लागतात. या सर्व पक्ष्यांची निर्मिती ही पर्यावरणानुसारच होत असते. ते ज्या वातावरणात राहतात, त्या वातावरणात ते मिसळले जातील अशा प्रकारे त्यांची शरीर रचना आणि रंग कायमच असतो, जेणेकरून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या पक्ष्यांच्या पिसांचा आकार आणि रंग जरी सारखे दिसत असले तरी मी ही पिसं बनवताना मला एक अनुभव आला की, प्रत्येक वेळेप्रमाणेच त्यांची प्रत्येक पिसे वेगळीच असतात. त्याच्या छटा, त्याची नक्षी ही भिन्नच असते. तरीही ते एकत्रित होतात. हा एक चमत्कारच म्हणायला पाहिजे. वरून आपल्याला मोठी पिसे दिसत असली तरी त्या पिसांच्या आतमध्ये त्यांच्या संरक्षणासाठी अजून एक पातळ मलमली पिसांचा थर असतो. यांच्या शरीरावरील सर्व पिसांची रचना उत्तम प्रकारे असल्यामुळे हे अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात.
पक्षी पाळणे हा कायद्याने गुन्हाच आहे. तरीही पक्षी हे पाळलेच जातात, कारणे काहीही असोत. हा पक्षी कोणालाही त्रास न देणारा, अत्यंत शांत, मनमिळावू, सुंदर पंखांचा असल्यामुळे त्याची शिकार मोठ्या प्रमाणात पाळीव पक्षी आणि खाद्य म्हणून केली जाते. या पक्ष्यांचे मांस हे चविष्ट आणि न्यूट्रिशियस असणारे असते ज्यांना रिच फूडमध्ये गणले जाते. तितर किंवा कोंबड्या यांच्यापेक्षा उच्च प्रथिनयुक्त असणारे हे पक्षी आहेत. हे कमी चरबीयुक्त, लोह, झिंक, खनिजयुक्त असे आहेत.
हे पक्षी चांगले उडू शकतात, त्यामुळे बऱ्याचदा यांना पाळणारे त्यांचे पंख कापतात. यांचे आकर्षक सौंदर्य आणि यांचा स्वभाव हा त्यांना सर्वात घातक ठरतो. त्यामुळेच हे पक्षी आता दुर्मीळ झाले आहेत. परमेश्वरी शक्तीने जीवसृष्टीतील प्रत्येक जीवासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा निसर्गनियमानुसार मुळातच अगदी योग्य पद्धतीने दिलेल्या आहेत. पण आपण मानव दिशाहीन होऊन आपल्या गरजा विरुद्ध पद्धतीने नेत आहोत आणि त्याचे परिणाम आपण स्वतःवरच नाही, तर या सर्व जीवसृष्टीवर करत आहोत. जेव्हा आपण पक्ष्यांची शिकार करून त्यांना शहरात राहण्यास भाग पाडतो, तेव्हा त्यांना आपल्याप्रमाणेच प्रदूषणाला सामोरे जावे लागते. ज्यासाठी त्यांची शरीररचना ही योग्य नाहीच. त्यांची शरीररचना ही नैसर्गिकरीत्या जंगलातच राहण्यायोग्य आहे. जंगलात असणाऱ्या सर्व पक्ष्यांचे आयुष्य सुद्धा हे नैसर्गिकरीत्या संघर्षमय असतेच; परंतु तरीही ते सुखी राहतात. कारण, मूलभूत गरजा अन्न आणि निवारा या त्यांना नैसर्गिकरीत्या मिळतच असतात. शिवाय नैसर्गिक शुद्ध वातावरण आणि आयुर्वेदिक औषधे सुद्धा. ज्याची त्यांना मुळातच समज असते ते सर्व काही त्यांना जंगलात मिळत असते. त्यामुळे त्यांचे आयुष्य जंगलातच सुखाचे असते.