स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने काँग्रेस, भाजपा, बीआरएस आदी पक्षांनी आपले निवडणूक जाहीरनामे घोषित करताना मोफत सेवा आणि सवलतींच्या घोषणांचा अक्षरश: वर्षाव केला आहे. मतदारांवर प्रलोभनांचा वर्षाव करायचा, हेच चित्र राज्यातील निवडणुकांच्या निमित्ताने विशेषत: तेलंगणा व राजस्थानात दिसून आले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) पक्षाने आपला पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास ४०० रुपयांत गॅस सिलिंडर व १५ लाख रुपयांपर्यंत औषधोपचार मोफत देण्याचे जाहीर केले आहे. बीआरएसने जाहीरनाम्यात राज्याचा अर्थसंकल्प ३ लाख कोटींपर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे. राज्यात बीआरएसचे सरकार आल्यानंतर महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील, असेही म्हटले आहे. रेशनवरील तांदळाचा कोटा वाढविण्याचेही प्रलोभन बीआरएसने दाखवले आहे.
तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाने आपला पक्ष सत्तेवर आल्यानंतर पाचशे रुपयांत गॅस सिलिंडर देऊ असे म्हटले आहे. तसेच महिलांना मोफत बस प्रवास, २०० युनिटपर्यंत वीज मोफत, इंदिराम्मा भेट योजनांतर्गत हिंदू मुलींना विवाहाच्या वेळी १ लाख रुपये व १० ग्रॅम सोने, अल्पसंख्याक समाजातील मुलींना विवाहाच्या वेळी १ लाख ६० हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या मुलींना मोफत स्कूटी देणार, तेलंगणा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे काढून घेणार, शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ तसेच शेतकऱ्यांना २० लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याचे आश्वासन तेलंगणात काँग्रेसने दिले आहे.
तेलंगणात भाजपाने आपण सत्तेवर आल्यावर धर्माच्या आधारित दिलेले आरक्षण रद्द करू असे म्हटले आहे. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल, तेलंगणातील ज्येष्ठ नागरिकांना रामलल्लाचे दर्शन मोफत घडविण्यात येईल, उज्ज्वला योजनेतील लाभार्थींना दरवर्षी चार गॅस सिलिंडर मोफत, कॉलेजमधील विद्यार्थांना लॅपटॉप मोफत, मुलीच्या नावावर ती जन्मताच दोन लाखांची मुदत ठेव, ती २१ वर्षांची झाल्यावर त्याची रक्कम परत मिळेल, अशी आश्वसाने दिली आहेत.
आसामचे मुख्यमंत्री व भाजपाचे नेते हिमंता बिस्व सरमा हेही तेलंगणात प्रचाराच्या मैदानात उतरले होते. त्यांच्या तडाखेबंद भाषणांनी भाजपाचे हितचिंतक खूश झाले. तेलंगणात भाजपाची सत्ता आल्यावर अवघ्या तीन मिनिटांत हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्यात येईल, असे जाहीर केले. अयोध्येत राम मंदिर उभारले गेले ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच, पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांची राम मंदिर उभारण्याची हिम्मत तरी होती का? असा प्रश्न त्यांनी विचारला. ज्या वेळी भारतावर शेजारी देशांच्या मदतीने दहशतवादी हल्ला झाला तेव्हा काँग्रेस सत्तेवर असताना बचावात्मक भूमिका घेतली जात असे, मात्र नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा भारताने सर्जिकल स्ट्राईक करून सडेतोड प्रत्युत्तर दिले असे सरमा यांनी प्रत्येक ठिकाणी सांगून भाजपाविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला. राहुल गांधी व प्रियंका वड्रा हे एका शब्दानेही हमासचा उल्लेख करीत नाहीत, याकडेही सरमा यांनी मोठ्या खुबीने मतदारांचे लक्ष वेधले. एआयएमआयएमला पॅलेस्टाइनविषयी एवढे प्रेम असेल, तर त्यांनी तिकडे जाऊन त्यांचे समर्थन करणारी भूमिका मांडावी असेही त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले. एकीकडे मतदारांवर आश्वासनांची खैरात व दुसरीकडे तडाखेबंद प्रचार अशा दोन्ही आघाड्यांवर भाजपाने तेलंगणाची निवडणूक लढवली.
राजस्थानात काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यावर जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. भाजपाने मात्र या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. काँग्रेसने म्हटले आहे की, गृहलक्ष्मी हमी योजनेखाली प्रत्येक घरातील प्रमुख महिलेच्या खात्यात दरवर्षी दहा हजार रुपये जमा केले जातील. गोवंश पाळणाऱ्यांकडून सरकार प्रति किलो २ रुपये या दराने शेण खरेदी करील, सरकारी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थिनींना लॅपटॉप मोफत दिले जातील, नैसर्गिक संकटाने पीडित परिवाराला १५ लाखांपर्यंत विमा कवच, प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची हमी, राजस्थानातील १ कोटी ४ लाख परिवारांना ५०० रुपयांत गॅस सिलिंडर तसेच उज्ज्वला बीपीएल परिवारातील कुटुंबांना ४०० रुपयांत गॅस सिलिंडर, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जारी, अशी प्रलोभने काँग्रेसने आपल्या मतदारांना दाखवली आहेत. काँग्रेसने दिलेली आश्वासने समाजातील सर्व लोकांना लाभदायक आहेत, असा दावा केला आहे. काँग्रेसने चार लाख सरकारी नोकरींसह १० लाख जणांना नोकऱ्या देण्याचा वादा आपल्या घोषणापत्रात केला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा राजस्थानमध्ये एक कोटी युवा मतदार असे आहेत की, त्यांना पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करण्याचा हक्क प्राप्त झाला होता. रोजगार ही युवकांची सर्वात मोठी गरज लक्षात घेऊन काँग्रेसने १० लाख नोकऱ्या देण्याचे प्रलोभन दाखवले आहे. काँग्रेसची सारी मदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा चेहरा व त्यांनी पाच वर्षांत केलेला कारभार यावर आहे.
राजस्थानमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी व माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पक्षाचे घोषणापत्र जारी केले. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसच्या कारकिर्दीत परीक्षांच्या पेपर फुटीच्या अनेक घटना घडल्या. वयोवृद्धांना निवृत्तिवेतन देण्यात मोठे घोटाळे झाले, केंद्राच्या जल जीवन मिशन योजना राबवतानाही घोटाळे झाले. राज्यात भाजपा सत्तेवर आल्यावर या सर्व घोटाळ्यांची एसआयटी (विशेष चौकशी पथक) नेमून चौकशी करील, असे भाजपाने म्हटले आहे.
राजस्थानात गेल्या पाच वर्षांत परीक्षांच्या पेपर फुटीच्या वारंवार घटना घडल्या. त्यामुळे जनतेत संताप आहे. जनतेचा रोष या निवडणुकीत काँग्रेसला धडा शिकवेल, असा भाजपाला विश्वास आहे. पेपर फुटीचा मुद्दा भाजपाने सतत मांडला. एसआयटी चौकशी झाल्यावर पेपर फुटीमागील सत्य उजेडात येईल, असे भाजपाला वाटते.
पंतप्रधान किसान निधी योजनांतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आहेत. राजस्थानात निवडणूक प्रचारातच ही रक्कम वाढवून १२ हजार रुपये करण्याची घोषणा झाली. गेल्या पाच वर्षांत कर्ज फेडू न शकल्यामुळे राजस्थानातील १९४२२ शेतकऱ्यांवर जमिनीचे लिलाव करण्याची पाळी आली. त्यांना मदत देण्याची घोषणाही भाजपाने केली आहे. राज्यातील आठ कोटी लोकांपैकी सहा कोटी म्हणजे ७५ टक्के जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी व त्यांच्या परिवाराला मदत करण्याची घोषणा भाजपाने करून शेतकरी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस व भाजपा दोन्ही पक्षांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी नोकऱ्या व रोजगार देण्याच्या घोषणा केल्या. भाजपाने अडीच लाख युवकांना सरकारी नोकऱ्या व रोजगार देण्याची घोषणा केली आहे, तर काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात ४ लाख नोकऱ्या व रोजगार देणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस व भाजपाने घोषणापत्रात महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. काँग्रेसने गृहलक्ष्मी योजनांतर्गत प्रत्येक गृहिणीला वर्षाला १० हजार रुपये आर्थिक सहाय्य देणार असे म्हटले आहे, तर भाजपाने प्रत्येक नवजात बालिकेच्या नावावर दोन लाखांचा बॉण्ड देणार असे वचन दिले आहे. काँग्रेस गरीब महिलांना ४०० रुपयांत गॅस सिलिंडर देणार आहे, तर भाजपाने ४५० रुपयांत सिलिंडर देऊ, असे म्हटले आहे.
महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रत्येक पोलीस ठाणे अंतर्गत अँटी रोमिओ स्क्वाड स्थापन करणार असल्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे. महिला मतदारांची संख्या ४९ टक्के आहे म्हणून महिलांना आकर्षित करणाऱ्या अनेक घोषणा दोन्ही पक्षांच्या निवडणूक जाहीरनाम्यात वाचायला मिळतात. काँग्रेसने राजस्थानात पाच वर्षांत १२०० इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. त्यापूर्वी सत्तेवर असलेल्या भाजपाने १५० विवेकानंद मॉडेल स्कूल सुरू केले. यावेळी सत्तेवर आल्यानंतर चारशेपेक्षा जास्त पीएम श्री स्कूल सुरू करण्याचा वादा भाजपाने केला आहे. देशातील मोठ्या शहारात नोकरी मिळवायची, तर इंग्रजी यायला हवेच, हे लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर राजकीय पक्ष भर देत आहेत. उज्ज्वला गॅस, पीएम निवास, स्वच्छता गृहे, गरिबांना मोफत रेशन अशा योजनांमुळे गरीब मतदार भाजपाकडे आकर्षित झालेला दिसतो, त्याचे फलित हे मतमोजणीच्या दिवशी समजू शकेल.