वन टाईम इन्व्हेस्टमेंट असलेले इलेक्ट्रॉनिक फटाके काय आहेत?
मुंबई : दिवाळी (Diwali) म्हटलं की फराळ, दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि फटाके डोळ्यांसमोर येतात. पण हल्ली जनजागृती होत असल्यामुळे फटाक्यांचे दुष्परिणाम आपण सर्वच जाणून आहोत. वायूप्रदूषण (Air Pollution) वाढल्याने यंदा फटाके फोडू नयेत असं आवाहनही करण्यात आलं आहे. पण काही जणांना फटाके फोडल्याशिवाय दिवाळी साजरी केली असं वाटतच नाही. अशांसाठी खास इलेक्ट्रॉनिक फटाक्यांचा (Electronic crackers) पर्याय उपलब्ध झाला आहे. फटाक्यांमुळे होणार्या आगीच्या दुर्घटना आणि प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रॉनिक फटाके हा उत्तम पर्याय आहे.
इलेक्ट्रॉनिक फटाके हे स्मार्ट डिव्हाईसेस (Smart Devices) असतात, जे लाईट आणि साऊंड जनरेट करतात. यामुळे खरोखरचे फटाके वाजवल्याचा आनंद मिळतो. या फटाक्यांमध्ये एकमेकांशी कनेक्ट असणारे छोटे-छोटे पॉड्स असतात. या पॉड्समध्ये LED लाईट्स असतात. प्लगइन केल्यानंतर या पॉड्समध्ये असणाऱ्या लाईट्स थोड्या-थोड्या कालावधीनंतर स्पार्क करतात. यासोबत साऊंडही जोडल्यास खरोखरचे फटाके वाजत असल्याचा आभास निर्माण होतो.
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरुन तुम्ही इलेक्ट्रॉनिक फटाके खरेदी करू शकता. अमेझॉनवर साधारणपणे २,५०० रुपयांपर्यंत हे डिव्हाईस उपलब्ध आहेत. तसंच, एकदा खरेदी केल्यानंतर हे फटाके पुढील काही वर्षे पुन्हा-पुन्हा वापरता येतात. गेल्या काही वर्षांपासून ही संकल्पना भारतात अस्तित्त्वात आली आहे. पण या फटाक्यांचा तितका वापर केला जात नाही. यंदा वाढते प्रदूषण लक्षात घेता अशाच ई-फटाक्यांतून दिवाळीचा आनंद घेणे गरजेचे आहे.
काय आहेत इलेक्ट्रॉनिक फटाक्यांचे फायदे?
इलेक्ट्रॉनिक फटाक्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे वायूप्रदूषण आणि आगीच्या दुर्घटनांना आळा बसतो. या डिव्हाईसेसना रिमोटने कंट्रोल देखील करता येतं. तसंच, फटाके वाजण्याच्या वेळा देखील बदलता येऊ शकतात. यांचा आवाज खऱ्या फटाक्यांएवढा मोठा नसतो. त्यामुळे ध्वनिप्रदूषणालाही आळा बसू शकतो. पुन्हा पुन्हा वापरता येत असल्याने ही एक अत्यंत फायद्याची वन-टाईम इन्व्हेस्टमेंट ठरते. या फटाक्यांचा वापर करणंही अगदी सोपं असतं.