पेण(देवा परवी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील सकल मराठा समाजा तर्फे उद्या मंगळवारी (दि.31 ऑक्टोबर) पासून पेण तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या बाबतचे निवेदन पेण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पेण तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, लहू पाटील, अविनाश पाटील, शिरीष मानकवळे, सागर पवार आदी मराठा नेते उपस्थित होते. मराठा समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण मिळावे म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे – पाटील हे आंतरवली सराठी, जि.जालना येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पेण तालुक्यातील मराठा समाज देखील एकवटला आहे.
मंगळवारी पेण तहसीलदार कार्यालया समोर सकाळी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत अन्न त्याग साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सदरचे साखळी उपोषण हे मराठा समाजाच्या न्याय हक्काची मागणी शासन मान्य करे पर्यंत तसेच मनोज जरांगे – पाटील यांचे उपोषण सुरु असे पर्यंत हे साखळी उपोषण सुरु राहील असे पेण तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.