करिअर: सुरेश वांदिले
दहावीनंतर अकरावीमध्ये प्रवेश घेताना दहावीत मिळालेल्या गुणांवर आधारित प्रवेश निश्चित केला जातो. विशेषत: मोठ्या शहरातील नामवंत आणि दर्जेदार शाळांमध्ये प्रवेश मिळावा, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते. काही महाविद्यालयांमधील प्रवेश हे ९० टक्क्यांपासूनच सुरू होतात. आता तर ९० टक्के गुण मिळणे हे तसे नवलाचे राहिलेले नाही. मनासारखे महाविद्यालय मिळाल्यावरही पुन्हा विद्यार्थी त्याच्या व त्यांच्या पालकांच्या मते उत्कृष्ट शिकवणी वर्गात नाव नोंदवतात. आर्थिकदृष्ट्या काही सुस्थितीतील पालक आपल्या घरीच शिक्षकांना सुयोग्य अशी बिदागी देऊन शिकवणीसाठी बोलवतात. म्हणजे १०वीनंतर हवे ते महाविद्यालय मिळाल्यावरही आपले समाधान काही होत नाही. शाळेचे नाव प्रमाणपत्रावर येण्यासाठी प्रवेशाचा अट्टहास केला जातो की काय? असे वाटावे अशी ही स्थिती. मात्र विद्यार्थ्यांने कोणत्या महाविद्यालयात ११वी व १२वी केले, हे पुढच्या करिअरच्या प्रवासासाठी अजिबातच महत्त्वाचे ठरत नाही. अमूक एका उत्कृष्ट महाविद्यालयातून ११-१२वी केले म्हणून काही अतिरिक्त एकही गुण मिळत नाही.
साहित्याचा मारा
चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणे उत्तमच. पण हा प्रवेश मिळाल्यावर त्या चांगल्या आणि दर्जेदार महाविद्यालयाचा फायदा करून घ्यायला हवा ना! आता तर काही पालक, एका शिकवणीसोबत काही विषयांसाठी आणखी एखाद्या अधिक उत्कृष्ट शिक्षकाची शिकवणीसाठी चाचपणी करतात. रिस्क (धोका) नको म्हणून काहीजण त्याही मार्गाने जातात. म्हणजे मुलाने हेही करावे तेही करावे. पुन्हा कुठे अपेक्षित संच वगैरे बाबत कानावर पडले तर तिकडेही धाव घेतली जाते. आणखी एखाद्या शिकवणी वर्गात नाव नोंदवलेल्या जवळच्या नातेवाईक/मित्राच्या मुलामुलींकडे असलेले, त्या शिकवणी वर्गाचे साहित्य घरी आणून ठेवले जाते. म्हणजे आता बोर्डाची क्रमिक पुस्तके, शिकवणी वर्गातील शिक्षकांच्या नोट्स, पुन्हा दुसऱ्या शिकवणी वर्गातल्या नोट्स, अपेक्षित संच अशी चौफेर शस्त्रे मुलांना दिली जातात. या अस्त्राशस्त्रांनीशी आपल्या मुलाला प्रचंड यश मिळणारच असा ठाम विश्वास पालकांना असतो. प्रारंभी विद्यार्थीही या सगळ्यांनी हरखून जातो आणि नंतर मात्र स्वत:ला हरवून बसतो. मग कधी हे बघ तर कधी ते बघ, असे त्याचे सुरू होते. या इकडे तिकडे बघण्यात गाडीची हवा हळूहळू निघायला सुरुवात होते. प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी तर गाडी गडगडू लागते. ११वी – १२वीमध्ये अभ्यास साहित्याचा मारा करण्याचा सोस पालकांनी टाळला पाहिजे. प्रचंड साहित्य दिल्याने मुलांना खूप गुण मिळतील असे काही शक्य नाही. या खूप साहित्याला बघण्यात आणि वाचण्यात मुलांचा बराच वेळ जातो, हे लक्षात घ्यायला हवे.
वेळ वाचवा
११ वीसाठी शैक्षणिक संस्थेची निवड करताना ही संस्था आपल्या घरापासून किती अंतरावर आहे, ही बाब सुद्धा लक्षात घ्यायला हवी. केवळ दर्जेदार संस्था आहे म्हणून घरापासून बऱ्याच लांब असलेल्या संस्थेत प्रवेश घेतल्यास मुलांचा जाण्या-येण्यात वेळही जातो आणि ऊर्जाही जाते. जाण्या-येण्याच्या या फेऱ्यात मुलांना मग अभ्यास करण्याचा उत्साह कितपत टिकून राहतो, हा संशोधनाचा विषय आहे. शिकवणी वर्गातच काहीही करून टाकायचेच आहे, असे पक्के ठरवल्यावर पुन्हा दूरच्या महाविद्यालयात पाठवणे श्रेयस्कर ठरत नाही. आता काही महाविद्यालये प्रात्यक्षिक सोडल्यास वर्गात अनुपस्थित राहण्याची परवानगी देतात. याचा सुद्धा बऱ्याच पालकांना अभिमान वाटतो.
मुद्दा ११वी-१२वीमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिकाधिक वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचा बहुमोल वेळ कसा वाया जाणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, व्यवस्थापन, डिझायनिंग, वास्तुकला आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११वी-१२वी मधील गुण हे तितकेसे महत्त्वाचे ठरत नाहीत. या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (प्रोफेशनल कोर्सेस जसे बीई/ एमबीबीएस/ बी.डिझाइन इत्यादी) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये मिळणारे अधिकाधिक गुण मुलांना इच्छित अभ्यासक्रम आणि संस्थेत पोहोचवत असतात.
दर्जेदार पुस्तके
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ११वी आणि १२वीची क्रमिक पुस्तकेही बरीच स्पर्धात्मक अशी तयार केली आहेत. या क्रमिक पुस्तकांचा व्यवस्थित आणि समजून उमजून आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्या दर्जावर विश्वास ठेऊन अभ्यास करायला हवा.