Tuesday, November 12, 2024
Homeताज्या घडामोडीव्हिडीओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

व्हिडीओ चित्रीकरण, पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

पथकर नाक्यांवरील सुविधांची उद्यापासून पाहणी

राज ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : पथकर नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागू नये यासाठी आवश्यक मनुष्यबळाची संख्या वाढवावी. स्वच्छतागृहासह रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुंबई एन्ट्री पॉईंटच्या टोल नाक्यांवर व्हीडीओ चित्रीकरण करण्यात यावे, पथकर मार्गावरील पुलांचे, उड्डाणपुलांचे, भुयारी रस्त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी झालेल्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रमोद पाटील, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळासमवेत आलेल्या मुलुंड, ठाणे येथील गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे टोल वाढ आणि टोल नाक्यांवरील गर्दी, सोयी सुविधा याबाबत समस्या मांडल्या. यावेळी टोल बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कराराप्रमाणे टोल नाक्यांवर कंत्राटदाराने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यामध्ये स्वच्छता गृहे, रुग्णवाहिका, प्रथमोपचार सुविधा, क्रेन याबाबी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता सतत राखली पाहिजे. मंत्री श्री. भुसे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी शिष्टमंडळातील प्रतिनीधींना सोबत घेऊन उद्यापासून टोल नाक्यांवरील सुविधांची पाहणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

टोल नाक्यांवर पिवळ्या पट्टीपर्यंत वाहनांची रांग लागणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घेतली पाहिजे. वाहनांच्या रांगा लागल्या तर तसेच वाहने सोडून दिली पाहिजे. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबई परिसरातील पाचही टोलनाक्यांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजण्यासाठी व्हिडीओग्राफी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पुढील १५ दिवस हे चित्रीकरण करावे असेही त्यांनी सांगितले. टोल मार्गावरील जे उड्डाणपुल, पुल, भुयारी मार्ग आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई हद्दीतील मुलुंड येथील हरिओम नगर वसाहतीतल रहिवाशांना टोल नाक्यावरून मुंबई जावे लागू नये यासाठी नवघर पोलिस ठाण्याजवळील नाल्यावर तातडीने पुल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पोलिसांच्या घरांच्या विषयावरही चर्चा झाली. पोलिसांना निवास देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे आणि त्यासाठी पुढाकारही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पोलिसांना हक्काची घरे मिळावीत यासाठी सिडकोला पाच हजार घरांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. मुंबईत पोलिसांना हक्काची घरे कशी मिळतील यासाठी खासगी विकासकांना आणि एसआरए प्रकल्पांमध्ये वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक देऊन अधिकची घरे मिळू शकतील का य़ासाठी अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अर्चना त्यागी, आदी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय झालं ते राज ठाकरे आज सांगणार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलप्रश्नावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे पासिंगच्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर उद्या शुक्रवारी 13 तारखेला राज ठाकरेंच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर सकाळी १० वाजता होणा-या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देऊ, असं राज ठाकरे म्हणाले. ‘मी तुम्हाला एकच वाक्य सांगणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. परंतु या चर्चेनंतर ठोस निर्णयापर्यंत येण्यासाठी उद्या सकाळी 8 वाजता माझ्या घरी बैठक आहे. त्या बैठकीत काय निर्णय होतो याबाबत मी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगेन. मुख्यमंत्री पूर्ण सकारात्मक आहेत. टोलबाबत कोणत्या गोष्टी होणार, काय निर्णय होणार हे मी उद्या सकाळी सांगेन. पोलिसांच्या घराबाबतही चर्चा झाली’, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -