Tuesday, April 14, 2026

Bihar : बिहारमध्ये बुधवारी सकाळी तीन नेतेच घेणार शपथ

Bihar : बिहारमध्ये बुधवारी सकाळी तीन नेतेच घेणार शपथ

पाटणा : जवळपास दोन दशकं बिहारचे नेतृत्व करणाऱ्या नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. आता ते जेडीयूचे राज्यसभा खासदार आणि एनडीएचे एक महत्त्वाचे नेते म्हणून दिल्लीत काम करणार आहेत. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर एनडीएतील अंतर्गत सामंजस्यानुसार बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने नव्या मुख्यमंत्र्यांची नावाची घोषणा केली आहे. नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या सम्राट चौधरींची एकमताने बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी सम्राट यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारला पाठिंबा दिल्याचे तसेच दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून काम करताना बिहारच्या विकासाला गती देण्यासाठी शक्य ते ते करणार असल्याचे जाहीर केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी भाजपचे सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. या व्यतिरिक्त जेडीयू अर्थात जनता दल युनायटेडचे ज्येष्ठ नेते बिजेंद्र प्रसाद यादव आणि विजय कुमार चौधरी हे दोघे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सध्या या तीन शपथविधींचा कार्यक्रम निश्चित आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर सम्राट चौधरी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप, जेडीयू, लोजपा - रामविलास पासवान गट, जितन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा यांच्या निवडक नेत्यांचा समावेश केला जाईल.

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडू आणि पुदुच्चेरी येथील विधानसभा निवडणुकांचा निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल येण्याआधीच बिहारमध्ये सम्राट चौधरी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे नियोजन करत आहेत. विधानसभांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बिहारमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त निश्चित केला जाणार असल्याचे वृत्त आहे.

Comments
Add Comment