उद्या दुपारी १२ वाजता विधानसभा अध्यक्ष घेणार सर्वांची परेड! पात्र-अपात्रेची टांगती तलवार
मुंबई : शिवसेनेतील अपात्र आमदारांच्या (Shivsena MLA disqualification case) नोटीसबाबतच्या सुनावणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व आमदारांना उद्या गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत उपस्थित राहण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील देवदत्त कामत आणि वकील असीम सरोदे यांच्यामार्फत वकीलपत्र ठाकरे गटाकडून सादर करण्यात आले आहे. हे वकील सुनावणी दरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू मांडतील.
याबाबतची माहिती देताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले, “१४ सप्टेंबरला म्हणजेच उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आम्हाला (ठाकरे गटाच्या आमदारांना) उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे. आम्ही आमचे म्हणणे लेखी स्वरुपात काल आणि आज अध्यक्षांकडे सादर केलेले आहे. अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार लेखी आणि तोंडी उत्तर आम्ही सुनावणी दरम्यान देऊ”
आम्ही मागच्या वेळी वैयक्तिक वकील पत्र सर्व आमदारांनी एकत्रित अध्यक्षांना दिले होते. तसेच वकिलामार्फत आमचे लेखी म्हणणे आम्ही वैयक्तिकरित्या अध्यक्षांना देत आहोत. सुनील प्रभू हे आमचे मुख्य प्रतोद आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वैधतेबद्दल टिपणी केली आहे, असेही वैभव नाईक यांनी सांगितले.
१६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, मग सर्व आमदारांना सुनावणीसाठी का बोलावले जात आहे?, असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे प्रतोद कोण आहे? शिवसेना नेमकी कोणाची आहे सगळ्यांना माहिती आहे. फक्त या निर्णयाकडे सर्व जनतेचे सुद्धा लक्ष लागले आहे. अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी आमची इच्छा आहे, असे वैभव नाईक म्हणाले.
आमचे ५४ आमदार जे निवडून आले, त्यांचे प्रतोद हे सुनील प्रभू आधी सुद्धा होते आणि कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आता सुद्धा आहेत. २३ जूनला आम्ही या अपात्रते संदर्भात आमचे म्हणणे अध्यक्षांकडे दिले होते. त्यानंतर आता किती महिने झाले? हा निर्णय लवकर लागणार नाही यामध्ये वेळ काढूपणा केला जाईल, अशी कुजबूज आम्हाला आहे, असा आरोप वैभव नाईक यांनी केला.
दरम्यान, उद्या सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटाच्या आमदारांची पुन्हा एक बैठक होईल आणि त्यानंतर बारा वाजता ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील. यामध्ये सुनावणी दरम्यान ठाकरे गटाकडून त्यांचे दोन वकीलच आमदारांची बाजू अध्यक्षांसमोर मांडतील.
मात्र अध्यक्षांकडून वैयक्तिकरित्या आमदारांना सुनावणी दरम्यान आपले म्हणणे मांडण्यास विचारले गेल्यास आमदार आपली भूमिका मांडतील.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra