नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेत (g-20 summit) सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत आलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो अखेर ३६ तासांच्या प्रतीक्षेनंतर मायदेशी परतले आहेत. त्यांना रविवारी कॅनडात परतायचे होते. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोन दिवस त्यांना भारतातच थांबावे लागले.
सरकारशी संबंधित सूत्रांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार भारत सरकारने ट्रुडो आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाला कॅनडामध्ये परतण्यासाठी एअर इंडिया वन विमानाची ऑफर देण्यात आली होती. मात्र कॅनडाने भारत सरकारची ही ऑफर धुडकावून लावली. भारत सरकारच्या या प्रस्तावाच्या सहा तासानंतर कॅनडा सरकारने सांगितले की ते कॅनडामधून आपले विमान येण्याची प्रतीक्षा करतील.
एअर इंडिया वन बोईंग ७७७ हे विमान आहे ज्याचा वापर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेशी दौऱ्यांसाठी करत असतात.
जी-२० परिषदेत भाग घेतल्यानंतर ट्रुडो रविवारी मायदेशी परतणार होते. मात्र उड्डाणाआधी तपासणीदरम्यान विमानात तांत्रिक बिघाड समोर आला. यानंतर कॅनडाच्या सुरक्षा एजन्सीनी विमान एअरबस CFC001ला उड्डाणापासून रोखले होते.
यानंतर कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते की जस्टिन ट्रुडो आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळाला भारतातून आणण्यासाठी एक बॅकअप विमान CFC002 येत आहे. दरम्यान, बॅकअप विमान आले नाही. ते विमान दुरुस्त झाल्यानंतर दुपारी १ वाजता रवाना झाले होते.