
आशिया कप स्पर्धेच्या मध्यातूनच घरी परतलेला जसप्रीत बुमराह झाला बाबा
मुंबई : आशिया चषक २०२३ च्या (Asia Cup 2023) मध्यावर भारतीय संघातून अचानक ब्रेक घेत स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आपल्या घरी परतला होता. त्यामुळे बुमराहने भारतीय संघाला धक्का दिल्याच्या चर्चा होत होत्या. आज नेपाळ विरुद्ध असलेल्या भारताच्या सामन्यात तो खेळताना दिसणार नाही त्यामुळे चाहते निराश झाले होते. पण बुमराहने चाहत्यांना एक वेगळीच आनंदाची बातमी दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन (Sanjana Ganesan) यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. शिवाय बुमराह केवळ आजचा सामना खेळणार नसून सुपर-४ साठी भारतीय संघात पुन्हा सामील होणार आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला. यामुळे बुमराह खूप खुश आहे आणि त्याने आपल्या बाळाचे नावही ठेवले आहे. या जोडप्याने घरातील छोट्या पाहुण्याला 'अंगद' असं नाव दिलं आहे.
जसप्रीत बुमराहने बाबा झाल्याचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला. त्याने एक्स-हँडलवर लिहिलं की, 'आमचं छोटं कुटुंब मोठं झालं आहे आणि आम्ही कधीच कल्पना केली नसेल इतकं अंतःकरण भरुन आलं आहे! आज सकाळी आम्ही आमच्या लहान मुलाचं, अंगद जसप्रीत बुमराहचं जगात स्वागत केलं. आमच्या आयुष्यातील हा एक नवीन अध्याय आहे आणि तो आपल्यासोबत घेऊन आलेल्या प्रत्येक गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत'. त्यामुळे आशिया कपमध्ये एकही षटक न टाकता भारतात परतलेल्या बुमराहविषयीच्या चर्चांना आता विराम मिळून आनंद साजरा होत आहे.
Our little family has grown & our hearts are fuller than we could ever imagine! This morning we welcomed our little boy, Angad Jasprit Bumrah into the world. We are over the moon and can’t wait for everything this new chapter of our lives brings with it ❤️ - Jasprit and Sanjana pic.twitter.com/j3RFOSpB8Q
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) September 4, 2023