
जाणून घ्या लॉन्चिंगची वेळ, ठिकाण आणि मोहिमेचे उद्दिष्ट
श्रीहरिकोटा : भारताने आपलं महत्त्वपूर्ण असं चांद्रयान मिशन (Chandrayaan Mission) यशस्वी केलं. यानंतर आता भारत सूर्यमोहिमेसाठी (Sun Mission) सज्ज आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी सूर्य मोहिमेसाठी आदित्य एल-१ चं काउंटडाऊन सुरू झालं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) आज यासंदर्भात माहिती दिली आहे. यापूर्वी, इस्रोच्या शास्त्रज्ञांची एक टीम आदित्य-L1 मिशनच्या मिनी मॉडेलसह तिरुमला श्री वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेली होती.
भारताची पहिली सौर मोहीम २ सप्टेंबर रोजी सकाळी ११:५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित होणार आहे. इस्त्रोच्या पीएसएलव्ही एक्सएल (PSLV XL) या रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल-१ मिशन सूर्याच्या दिशेनं झेपावणार आहे. भारताच्या या आदित्य एल-१ मिशनचा प्रमुख हेतू हा अंतराळातून सूर्यावरील घडामोडींचं निरीक्षण करणं हा आहे.
आदित्य एल-१ मिशन आहे तरी काय?
आदित्य एल-१ मिशनच्या लॉन्चिंगपूर्वी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S. Somnath) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉन्चिंगनंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य एल-१ या अंतराळयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. एल-१ हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच १५ लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर १५ कोटी किलोमीटर आहे. आदित्य एल-१ मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे.
पुढे ते म्हणाले की, या मोहिमेसाठी प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रॉकेट आणि उपग्रह तयार आहेत. प्रक्षेपणाची तालीमही पूर्ण झाली आहे. इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C57 आदित्य एल-१ ला पृथ्वीच्या लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये सोडेल. यानंतर, तीन किंवा चार ऑर्बिट मैन्यूवर केल्यानंतर, ते थेट पृथ्वीच्या स्फेयर ऑफ इंफ्लूएंस (Sphere Of Influence) बाहेर जाईल. त्यानंतर क्रूझचा टप्पा सुरू होईल. हा टप्पा जरा जास्त काळ चालेल.
आदित्य एल-१हे हॅलो ऑर्बिटमध्ये (Halo Orbit) समाविष्ट केलं जाईल. जिथे एल-१ पॉईंट आहे. हा पॉईंट सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे. पण सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत तो फक्त १ टक्के आहे. या प्रवासासाठी १२७ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हे अवघड मानलं जातं, कारण त्याला दोन मोठ्या ऑर्बिटमधून जावं लागतं.
सौर मोहिमेचे उद्दिष्ट काय?
आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करणारी आणि सूर्याची रहस्ये उलगडणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. आदित्य एल-१ मिशन पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर कापेल, जे चंद्रापेक्षा चार पट जास्त आहे. आदित्य एल-१ मोहिमेचे उद्दिष्ट सूर्याचे कोरोनल हीटिंग आणि सौर पवन प्रवेग समजून घेणे, सौर वातावरणाची गतिशीलता, सौर वाऱ्याचे वितरण आणि तापमान समजून घेणे आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणं हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.