Thursday, July 25, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखGoa tourism: गोव्याच्या पर्यटन उद्योग क्षेत्रावर सकारात्मक परिणाम

Goa tourism: गोव्याच्या पर्यटन उद्योग क्षेत्रावर सकारात्मक परिणाम

रोहन खंवटे

सध्याचे जग हे विविध मार्गांनी परस्परांसोबतची जोडणी आणि जागतिक सहकार्याचे आहे. सध्याच्या अशा जगात, जी-२० सारखे आंतरराष्ट्रीय मंच कोणत्याही देशाच्या विकासाच्या वाटचालीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यादृष्टीने पाहिले तर सध्या जी-२० समूहाचे अध्यक्षपद भारताकडे असणे हे आपल्या देशासाठी, विशेषत: पर्यटन उद्योगाच्या भरभराटीसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यासारख्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचेच आहे.

गोवा हा गेल्या अनेक दशकांपासून पर्यटकांसाठी आकर्षणाचा प्रदेश राहिला आहे. इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सध्या ‘गोवा बियॉन्ड द बीच’ हा उपक्रमही राबवला जात आहे. या उपक्रमामुळे पर्यटकांमधले गोव्याच्या नैसर्गिक सौंदर्याबाबतचे आकर्षण हे सूर्यप्रकाशाने उजळून निघालेल्या समुद्रकिनाऱ्यांच्याही पलीकडे पोहोचले आहे. या उपक्रमामुळे गोव्यातला समुद्रकिनाऱ्यांपलीकडचा इथल्या हिरव्यागार डोंगराळ भागांचा, शांतमय बॅकवॉटर्स, वैविध्यपूर्ण वन्यजीवांचे अस्तित्व असलेली अभयारण्ये आणि विविध स्थानिक बाजारपेठांसारखा दृष्टिआड गेलेला खजिना उलगडून समोर येऊ लागला आहे. पर्यटकांना इथल्या बाजारपेठांमध्ये राज्याची अस्सल चव, आणि इथली कारागिरी अनुभवायला मिळू लागली आहे.

सातत्याने आणि झपाट्याने बदलत असलेल्या या जगात जी-२०चे अध्यक्षपद स्वीकारताच भारताने जगाला, आपली आर्थिक क्षमता, धोरणात्मक सामर्थ्य आणि सांस्कृतिक विविधता दाखविण्याची संधीही अगदी नियोजनपूर्वक साधली. या अध्यक्षपदामुळे अवघ्या जगाचे लक्ष भारताकडेच लागून राहिलेले आहे आणि त्यामुळेच गोवादेखील अगदी नकळत प्रकाशझोतात येऊ शकला. याचे स्वाभाविक कारण म्हणजे या काळात गोव्यात जी-२० अंतर्गतच्या इतर अनेक बैठकांचे आयोजन तर केले गेलेच, पण त्यासोबतच भारताची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात जी-२० समूहाच्या पर्यटन कार्यकारी गटाची महत्त्वाची बैठक आणि मंत्रिस्तरीय बैठकदेखील आयोजित केली गेली.

जी-२० शिखर परिषदेच्या निमित्ताने देशात येणाऱ्या विविध देशांचे नेते, राजनैतिक अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गोव्याचे नैसर्गिक सौंदर्य, इथली प्राचीन मंदिरे, मशिदी, पोर्तुगीजांच्या काळातली अनेक अद्वितीय वारसा घरे, तसेच चर्चपासून ते इथली बहुसांस्कृतिक खाद्यसंस्कृती आणि पाककला, इथल्या रूढी आणि परंपरांपर्यंत व्यापक सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवण्याची अनोखी संधी गोव्याला मिळाली. या सगळ्याला प्रसारमाध्यमांनी दिलेली व्यापक प्रसिद्धी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांनी दाखवलेला रस यामुळे जागतिक पातळीवर गोव्याला मोठी प्रसिद्धीही मिळाली. स्वाभाविकपणे यामुळे जी-२० च्या आनुषंगाने होत असलेल्या चर्चांसोबतच, गोव्याचा स्थायीभाव असलेल्या आदरातिथ्याकडेही जी-२०च्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचे लक्ष वेधले गेले आणि पाहुण्यांची मनेही जिंकली.

गोव्यात झालेल्या जी-२० पर्यटनविषयक कार्यकारी गटाच्या तसेच मंत्रिस्तरीय बैठकीतही गोव्याच्या पर्यटन आराखड्याला मान्यता मिळाली. या आराखड्याला सर्व भागधारकांनी पाठिंबाही दर्शवला तसेच शाश्वत पर्यटनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दृढ वचनबद्धताही दर्शवला. आता गोव्याचा पर्यटनविषयक आराखडा अगदी जोरदारपणे राबवला जात आहे. या आराखड्यात प्रामुख्याने पाच प्राधान्यक्रमांचे मुद्दे ठरवले गेले आहेत. यात शाश्वत पर्यटन/हरित पर्यटन, डिजिटलायझेशन, कौशल्य विकास, पर्यटनविषयक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग तसेच पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन या मुद्द्यांचा समावेश आहे. खरे तर या आराखड्याच्या या पाच मुख्य स्तंभाना बळकटी देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशी विविधांगी धोरणे गोव्या सरकारच्या वतीने या आधीपासूनच राबवली जात आहेत. यात होमस्टे धोरणासह, काराव्हॅन धोरण आणि येऊ घातलेल्या कृषी पर्यटन धोरणाचा समावेश आहे.

शाश्वत विकासासाठीच्या ध्येय उद्दिष्टांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या दृष्टीने जी-२० समूहातील देशांसह इतर देशांची सरकारे तसेच पर्यटन उद्योगक्षेत्रातील इतर कंपन्यांना या क्षेत्रातील क्षमतेचा लाभ घेण्यासाठी, इच्छेनुसार साधनसंपत्ती उपलब्ध करून देणे हाच गोव्याच्या पर्यटनविषयक आराखडा अर्थात ‘गोवा रोडमॅप फॉर टुरिझम’चा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट अर्थात लाईफ या चळवळीला पुरक ठरू शकेल या अानुषंगाने आणि पर्यटकांना आयुष्यभरातील आठवणीतल्या प्रवासाचा अनुभव देऊ शकेल, अशा प्रकारच्या पर्यटनकेंद्री उपक्रमांना चालना देण्यावर या आराखड्यात भर दिला गेला आहे.

जी-२० च्या गोव्यात झालेल्या बैठकांमुळे, बैठका, चालनावर्धक उपक्रम, परिषदा आणि प्रदर्शनविषयक पर्यटनासाठी गोव्यात असलेल्या पायाभूत सुविधा आणि पुरक व्यवस्थांच्या जाळ्याविषयीची माहिती जगासमोर आली, स्वाभाविकपणे यामुळे गोवा हे बैठका, चालनावर्धक उपक्रम, परिषदा आणि प्रदर्शनविषयक पर्यटनाच्या बाबतीत देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून लक्षात राहायला मदत होणारआहे.

जी-२० च्या गोव्यातल्या बैठकांच्या वेळी राज्यात जगभरातले नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार होते, त्यांच्या स्वागताची तयारी म्हणून राज्यभरातल्याविमानतळ, रस्ते आणि निवास सुविधांच्या सोबतच राज्याच्या इतर आवश्यक पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर पुन्हा एकदा भर दिला गेला. या बैठकांच्या निमित्ताने राज्यातल्या पायाभूत सुविधांमध्ये घडून आलेल्या सुधारणांमुळे जी-२० शिखर परिषदेसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता करता आलीच, पण त्यामुळेच भविष्यात राज्यात येणाऱ्या पर्यटकांना, एका उत्तम पर्यटनस्थळाचा अनुभव मिळेल याचीही तजवीज झाली.

यासोबतच या पायाभूत सुविधांमुळे गोव्याची राज्यांतर्गत आणि देशाच्या इतर भागांसोबतची परस्पर जोडणी आणि संपर्क वाढला, त्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गोव्यात ये-जा करणेही अधिक सुलभ झाले आहे. जी-२० च्या निमित्ताने राज्याची हवाई प्रवासाबाबतची परस्पर जोडणी अधिक सुधारल्यामुळे या परिषदेसाठी येणाऱ्यांची सोय तर झालीच, पण त्यासोबतच, आराम करण्यासह, साहसी पर्यटन एकाच ठिकाणी करता येईल अशा ठिकाणाच्या शोधात असलेल्या पर्यटकांनाही यादृष्टीने अधिक सोयीस्कर असे गोव्यासारखे नवे ठिकाणही मिळाले. या सगळ्याच्या बरोबरीनेच राज्याला ‘देखो अपना देश’ या मोहिमेचा राज्यांतर्गत आणि राज्याशी जोडलेल्या ठिकाणांच्या आनुषंगानेही प्रचार प्रसारही करता आला.

भारताकडे आलेल्या जी-२०च्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, शाश्वतता आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांवर व्यापक चर्चा करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली. महत्त्वाचे म्हणजे या संकल्पना गोव्याच्या पर्यटनविषयक दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगतच आहेत. या परिषदेच्या निमित्ताने जागतिक नेत्यांनी जगासमोरची आव्हाने, शाश्वत पर्यटन पद्धती यावर विस्तृत चर्चा केली. त्यामुळे स्वाभाविकपणे विकासाची जबाबदारीपूर्वक प्रक्रिया राबवण्याची गरजही अधोरेखीत झाली. या बैठकांमध्ये पर्यावरणविषयक जाणिवांवर भर दिला गेला. खरे तर ही बाब गोवा सरकारकडून गोव्याच्या अंतर्गत भागात समूह पर्यटनाशी जोडून, पर्यावरण संवर्धनासह पर्यटन वाढीसाठीच्या प्रयत्नांत समतोल राखण्यासाठी राबवल्या जात असलेल्या उपाययोजनांशी सुसंगतच होती. यामुळे गोव्यातील नद्यांसह इथले पर्यटनविषयक वैविध्यपूर्ण अंतरंग अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काँक्रीटच्या वापराची गरजच उरत नाही.

गोवा हे एका अर्थाने भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि इथल्या परंपरेचे एक प्रकारचे छोटे रूपच आहे. आणि हेच रूप जगासमोर आणण्याची मोठी संधी जी-२० परिषदेने उपलब्ध करून दिली आणि त्याद्वारे परस्पर सांस्कृतिक देवाण-घेवाण आणि संवादासाठी एक अनोखे व्यासपीठही उपलब्ध करून दिले. जी-२० च्या निमित्ताने गोव्यात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून, इथली कलात्मक प्रतिभा, स्थानिक कारागिरी आणि पाकसंस्कृतीचा अनुभव आंतरराष्ट्रीय समुदायाला घेता आला. सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या बाबतीत वाढलेल्या उत्सुकतेने गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातही वैविध्यता आली. समुद्रकिनारे आणि नाईटलाईफच्या पलीकडे जात इथे येणारे पाहुणे हे स्थानिक समुदायांशी संवाद साधता येऊ शकेल, त्यांच्या प्रथा पारंपरा जाणून घेता येऊ शकेल, साओ जोआओ – चिकालो अशा राज्यातल्या चैतन्यपूर्ण उत्सवी सोहळ्यांमध्ये रमून जाता येऊ शकेल अशा प्रकारचा निर्भेळ आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करू लागले. एका अर्थाने केवळ प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवण्याच्या पारंपरिक पर्यटन धोरणाऐवजी, प्रायोगिक पर्यटनाकडे लक्ष देण्याच्या दिशेने झालेल्या या बदलांनी इथे आलेल्या पर्यटकांना समृद्ध अनुभव तर मिळालाच, पण त्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेतही सकारात्मक योगदानाची मोठी भर पडली.

गोव्यात जी-२० समूहाच्या चौथ्या पर्यटनविषयक कार्यकारी गटाची बैठक आणि पर्यटनविषयक मंत्रिस्तरीय बैठकीच्या बरोबरीनेच, २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चा योगही जुळून आला होता. यानिमित्ताने गोवा सरकारने राजभवनात विशेष योग सत्राचे आयोजनही केले होते. या सत्रात सर्व देशांचे पर्यटनमंत्री आणि प्रतिनिधींना योगाभ्यासाचा अभूतपूर्व अनुभव घेतला. या विशेष सत्रामुळे त्यांना बैठकांमुळे सतत व्यस्त राहून कराव्या लागत असलेल्या कामांच्या दरम्यान शांततामय वातावरण आणि मनःशांतीचा क्षण अनुभवता आला. खरे तर या सत्राने पर्यटन उद्योग क्षेत्रात आरोग्यविषयक उपचार पद्धतींचा समावेश करण्याच्या गरजेचे महत्त्व तर अधोरेखित केलेच, त्यासोबतच आरोग्यविषयक सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे महत्त्वही जगासमोर आणले. (लेखक गोवा सरकारच्या पर्यटन, माहिती तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंवाद या विभागांचे मंत्री आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -