IPL 2026 CSK VS MI : आयपीएल २०२६ मध्ये आज (शनिवार २ मे) चेन्नई आणि मुंबई यांचा आमना-सामना होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा विजेते झालेल्या दोन्ही सघांची टक्कर आहे. विशेष म्हणजे यंदा मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांची कामगिरी त्यांच्या पूर्वेतिहासाला साजेशी अशी झालेली नाही. आजचा सामना दोन्ही संघांसाठी स्वतःची कामगिरी सुधारण्याची एक संधी आहे.
मुंबईसाठी चेन्नई विरुद्धचा सामना हा 'करो-या-मरो'चा सामना आहे. हा सामना गमावल्यास मुंबई गुणतक्त्यात तळाला जाण्याचा धोका आहे. चेन्नईची परिस्थिती मुंबईच्या तुलनेत बरी आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये घरच्या मैदानावरील सामन्यांत चेन्नईची कामगिरी चांगली आहे. यामुळे घरच्या मैदानावरील सामन्यात चेन्नईची बाजू वरचढ असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.वानखेडेवर झालेल्या मुंबई विरुद्ध चेन्नई या सामन्यात चेन्नईने मुंबईचा १०३ धावांनी पराभव केला होता. या पराभवाचा बदला मुंबई घेणार का ? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
मुंबई आणि चेन्नईची स्थिती
मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघाचे प्रत्येकी आठ सामने झाले आहेत. यात मुंबई ने फक्त दोन सामने जिंकले आहेत, ते गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहेत. तर आठ पैकी तीन सामने जिंकून चेन्नई गुणतक्त्यात सहाव्या स्थानी आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबईची घसरण
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात यंदाच्या हंगामात विजयाने सुरुवात करणाऱ्या मुंबईचे नंतर एका मागून एक असे मोठे पराभव झाले. आता आठ पैकी सहा सामने गमावलेला मुंबईचा संघ फक्त चार गुणांसह गुणतक्त्यात नवव्या स्थानी आहे. याउलट ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईने आठ पैकी तीन सामने जिंकले आहेत.चेन्नईकडून संजू सॅमसनने दोन शतके झळकावली आहेत, तर गोलंदाजीत अंशुल कंबोज चांगल्या फॉर्मात आहे. मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन यांनी शतके झळकावली असली तरी संघाला सातत्यपूर्ण विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजीवर मोठी जबाबदारी असणार आहे.मुंबईला पुढच्या फेरीत जाण्यासाठी चेन्नई विरुद्धचा सामना आणि पुढील सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. यामुळेच चेन्नई विरुद्धचा सामना मुंबईसाठी जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई एकमेकांसमोर ४० वेळा आले आहेत. यातील २१ सामने मुंबईने तर १९ सामने चेन्नईने जिंकले आहेत. आता आजच्या ४१ व्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.






