
पंतप्रधानांच्या भाषणावर बहिष्कार टाकण्याचे प्रकरण भोवणार
मुंबई : लोकसभेतील पंतप्रधानांच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या शिवसेनेच्या (ShivSena) पाच खासदारांवर कारवाई होणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दिली.
विरोधी पक्षांकडून लोकसभेत अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्याला पंतप्प्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाद्वारे उत्तर दिले. या अविश्वास ठरावाच्या मतदानादरम्यान शिवसेनेच्या खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता. मात्र यावेळी ठाकरे गटाचे ५ खासदार अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
शेवाळे यांनी खुलासा केला की, ‘पक्षाने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केला होता. मात्र, त्यावेळी पाच खासदार गैरहजर होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल.’ याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली जाईल आणि सोमवारी संबंधित खासदारांना औपचारिक नोटिस पाठवल्या जातील, असेही शेवाळे यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, पक्ष लोकसभेत एकसंध अस्तित्व म्हणून काम करत आहे. त्यामुळे भावना गवळी यांनी प्रसारित केलेला व्हीप शिवसेना पक्षाच्या सदस्यांनी मानने गरजेचे आहे. गुरुवारी अविश्वास ठरावावर मतदानावेळी विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी देखील वॉक आउट केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
दरम्यान, शिंदे गट कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत माध्यमांनी वृत्तही दिले होते. याबाबत शेवाळे यांना विचारले असता त्यांनी, अशी कुठलीही चर्चा नाही. अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे यावर चर्चा होण्याचा प्रश्न नाही, असे राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.