
पीओपी गणेशमूर्तींनाही परवानगी; पालिकेचा दिलासा
मुंबई : गणेश मूर्तींच्या उंचीच्या मर्यादेची अट हमीपत्रातून वगळण्यात आली असून यंदाच्या वर्षी पीओपी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करता येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह पीओपीची गणेश मूर्ती साकारणाऱ्या मुर्तिकारांना पालिकेचा दिलासा मिळाला आहे.
१९ सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. मुंबईत १२ हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तर १ लाख ९० हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा हमीपत्रात गणेश मूर्तीच्या उंचीवर ४ फूटाच्या मर्यादेमुळे गणेशोत्सव मंडळासमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र मुंबई महापालिकेने हमीपत्रातून अट वगळली आहे. तसेच पीओपीच्या गणेशमूर्तीची अट देखील शिथिल केल्याचे मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितले.
श्री गणेश मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता यावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२३ पासून संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधे अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर > नागरिकांकरिता टॅब >अर्ज करा > मंडप (गणेश/नवरात्रोत्सव) > Ganpati/Navaraytri Mandap Application मध्ये नमूद केलेल्या लिंकवर १ ऑगस्टपासून १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.