अटक केल्यानंतर स्पष्ट झाली ‘ही’ बातमी
मुंबई : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रूमला आज सकाळी एक धमकीचा कॉल (Threat call) आला. फोनवर बोलताना संबंधित व्यक्तीनं मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. त्याच्या ठिकाणाबद्दल विचारले असता जुहूच्या विलेपार्ले (Juhu Vileparle) परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. यामुळे मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु करत अवघ्या दीड ते दोन तासांतच आरोपीला आपल्या ताब्यात घेतले.
अशोक मुखिया (Ashok Mukhia) असं आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल करणाऱ्या अशोक मुखियाला जुहू पोलिसांनी विलेपार्ले येथील नेहरू नगर परिसरातून अटक केली आहे. तो २५ वर्षांचा असून मुंबईतील एका हॉटेलमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. आरोपी बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध बिहारमध्येही गुन्हा दाखल आहे. आता मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसचे पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.
अटक केल्यानंतर स्पष्ट झाली ‘ही’ बातमी
दरम्यान, आरोपीने केलेला कॉल हा फोक कॉल असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. मुंबई लोकलमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा बॉम्ब ठेवण्यात आला नसल्याचे या तपासातून समजले. परंतु आरोपीने हा फेक कॉल का केला असावा याचा खुलासा अद्याप झालेला नाही. आरोपीने धमकी का दिली? तो नशेत होता का? याचा तपास सध्या जुहू पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला ज्यात संबंधित व्यक्तीने मुंबई लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचं सांगितलं. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून फोन करत असल्याचे सांगून कॉलरने फोन बंद केला. काही वेळानं फोन करणाऱ्यानं त्याचा मोबाईल बंद केला होता. या फोनमुळे मुंबई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीस ठाण्याला दिली.
कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र कुर्ला, ठाणे, कल्याण टिळकनगर अशी वेगवेगळी ठिकाणं सांगितली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या फोनचे लोकेशन ट्रेस केले असता त्याने जुहू येथून फोन केल्याचे निष्पन्न झाले. आता संबंधित आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक चौकशी सुरु आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra