मोबाइलवरून दिली जायची ऑर्डर
मुंबई : डोंगरी बालसुधारगृहात मुलांना सुधारण्याऐवजी चक्क बिघडवण्यात येत असल्याचे आणि या ठिकाणी चक्क भिंतीपलीकडून राजरोस ड्रग्ज पोहोचत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस शिपाई आकाश शिंदे (२८) यांनी डोंगरी बाल निरीक्षक गृह येथे गार्ड म्हणून कर्तव्यावर असताना निरीक्षण गृहाचे अधीक्षक कंठीकर यांच्या सूचनेवरून त्यांनी तेथील बालकांची पथकाच्या मदतीने झाडाझडती सुरू केली. पावणेपाचच्या सुमारास जुन्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या साहिल बाबू पाटोळे (१८ वर्ष ७ दिवस) आणि शरीफ अकबर शेख (१८ वर्ष ११ महिने १५ दिवस) हे दोघेही झडतीला विरोध करू लागले. त्यामुळे शिंदे यांना संशय आला. त्यांनी दोघांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात दोन प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये गांजा सापडला. तसेच मोबाइल आणि ब्लेडचा तुकडाही आढळला. शिंदे आणि पथकाने मुद्देमाल जप्त करत डोंगरी पोलिसांच्या ताब्यात दिला. पाटोळे हा हत्येच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून येथे कैद आहे.
दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे १५ ग्रॅम गांजा तसेच, चिनीमातीची गांजा ओढण्याची चिलीम, सफेद रंगाचे कापड, मोबाईल आणि ब्लेड सापडले.
त्यांची अधिक चौकशी केली असता, ते मोबाइलवरून ड्रग्ज मागवत असल्याची माहिती मिळाली. यापूर्वीही अशाच प्रकारे आलेला गांजा अन्य अंमलदाराने जप्त केल्याचे कारागृहातील कर्मचाऱ्याने सांगितले.