Saturday, May 2, 2026

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण आता माझ्यावर जाणीवपूर्वक टीका केली जात आहे. मात्र, पैशाने विकल्या जाणाऱ्या अशा चिथावणीखोर लोकांची आम्ही अजिबात पर्वा करत नाही," असा घणाघाती हल्ला बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी नागपुरात बोलताना केला. आपण घेतलेल्या राजकीय निर्णयावरून होणाऱ्या टीकेला त्यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले, तसेच शेतकरी आणि दिव्यांगांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.

शिवसेनेचा नवा चेहरा आणि शेतकऱ्यांचा लढा

आपल्या नव्या राजकीय वाटचालीबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आता महाराष्ट्राला शिवसेनेचा एक नवा चेहरा पाहायला मिळेल. हा चेहरा केवळ राजकारण करणारा नसून तो शेतकरी आणि दिव्यांगांसाठी रस्त्यावर उतरून लढणारा असेल. "माझ्या हातात असलेला भगवा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आहे. याच विचाराने आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहोत. शिवसेनेची ताकद वाढवून ती शेतकरी आणि दिव्यांगांच्या पाठीशी खंबीरपणे उभी करू. काहीही सुटले तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत मी शेतकरी, कामगार आणि दिव्यांगांची साथ सोडणार नाही," अशी भावनिक साद त्यांनी घातली.

१५ वर्षे एकटा लढलो, अंगावर ३०० गुन्हे!

कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमावर स्पष्टीकरण देताना कडू म्हणाले की, ज्यांना खऱ्या अर्थाने काम करायचे आहे, ते सोबत येतील. मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही. स्वतःच्या राजकीय संघर्षाची आठवण करून देताना कडू म्हणाले, "माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि त्यानंतर प्रहार संघटनेमधून पुढे गेली. मी १५ वर्षे एकटा लढलो. पाच ते सहा निवडणुका कोणत्याही पक्षाच्या पाठिंब्याविना जिंकलो. जनतेच्या प्रश्नांसाठी अंगावर तब्बल ३०० गुन्हे दाखल करून घेणारा बच्चू कडू शिवाय दुसरा नेता तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही." यावेळी त्यांनी इतर पक्षांच्या आघाड्यांवरही बोट ठेवले. "राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले, काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी एकत्र बसले, भर महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. तेव्हा त्यांच्यावर कोणी टीका केली नाही. पण टीका करण्यासाठी सगळ्यांना फक्त बच्चू कडूच मिळतो का?" असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हौसे, नवसे, गौसेंना मी घाबरत नाही

टीकाकारांचा समाचार घेताना बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले होते. "चिथावणीखोर लोक हे पैशाने विकत मिळतात, ते विकाऊ असतात. अशा लोकांची आम्ही पर्वा करत नाही. जेव्हा प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांनाही लोकांनी नावे ठेवली, तिथे मी तर एक अतिशय सामान्य माणूस आहे. या हौसे, नवसे आणि गौसे लोकांना बच्चू कडू कधीही घाबरणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

१५-२० दिवसांत कर्जमाफीचा शासन निर्णय (GR)

शेतकरी आंदोलनावर बोलताना कडू यांनी ठणकावून सांगितले की, "शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून घेण्यासाठी माझ्या व्यतिरिक्त मैदानात दुसरा कोणीही नेता नव्हता." येत्या १५ ते २० दिवसांत शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय निघणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. "सध्याचे राजकारण केवळ जात आणि धर्माभोवती फिरत असून मूळ मुद्दे कुठेतरी हरवले आहेत. जर आम्ही राजकारणात टिकलो, तरच शेतकरी आणि दिव्यांगांचे हे महत्त्वाचे मुद्दे टिकतील. म्हणूनच हा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि अशा ढोंगी लोकांच्या चर्चेला बळी पडू नका," असे आवाहनही बच्चू कडू यांनी शेवटी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >