Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीधरणाचे काम आणि मरण येई पर्यंत थांब धोरणाचा निषेध, आषाढी एकादशीला मागितली...

धरणाचे काम आणि मरण येई पर्यंत थांब धोरणाचा निषेध, आषाढी एकादशीला मागितली आत्मदहनाची परवानगी

‘देवनाचा’ सिंचन साठी मंत्रालयासमोर अडीच हजार शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

येवला : देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू करा, साठवण तलावात पाणी अडवा आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध करून द्या, अन्यथा येत्या २९ जूनला मुख्यमंत्री पंढरपूरला आषाढी एकादशीची पूजा करत असताना येवल्यातील शेतकरी मंत्रालयासमोर पहाटे ४ वाजता आत्मदहन करतील असा इशारा येवल्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.

तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पासाठी २०१२ पासून शेतकरी पाठपुरावा करत आहेत. आमचा संयम आता संपला आहे. पाण्याची वाट बघणारे अनेक शेतकरी पाणी न बघताच मयत झाले. अजून किती वर्षे पाण्याची वाट बघायची? अडलेले पाणी दाखवण्या साठी धडक कृती कार्यक्रम राबवा , अन्यथा येत्या २९ जून रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे ४ वाजता मंत्रालयासमोर आत्मदहन करू असा इशारा येवला तालुक्यातील देवनाचा सिंचन प्रकल्पाच्या प्रस्तावित लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला आहे. निवेदनावर कृती समितीचे सचिव जगनराव मोरे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात, सह सचिव अर्जुन दाणे , विनायक थोरात यांच्यासह तब्बल २३७७ शेतकऱ्यांच्या सह्या असलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री सुधीर मनगुंटीवार व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सामान्य प्रशासन अधिकारी भीमराज दराडे , तसेच मुख्यमंत्री सचिवालय यांच्या नाशिक विभागीय कार्यालयातील कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री हे स्वतः च जलसंधारण मंत्री असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मंत्रालयात एकत्रित बैठक लावण्याची मागणी जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांनी केली आहे. अन्यथा कोणतीही इतर पूर्वसूचना न देता शेतकरी आत्मदहन करतील असेही कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

धरणाचे काम आणि मरण येईपर्यंत थांब

४ पक्षाचे ४ मुख्यमंत्री झालेत, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आणि सध्या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. संबधित जलसंधारण मंत्री, जलसंपदा मंत्री , वन मंत्री किती तरी बदलून गेलेत, खात्यांचे सचिव निवृत्त झालेत.अनेक अधिकारी होऊन बदलून गेलेत . असंख्य पाहण्या, असंख्य मोजण्या, असंख्य अहवाल, किती तरी परवानग्या आणि किती तरी मान्यता मिळाल्या, पण थेंबभर पाणी अडले नाही, फायलींचा प्रवास स्थानिक कार्यालय , मंडल कार्यालय, राज्य मुख्यालय, खोरे महामंडळ आणि राज्य शासन असा वरून खाली आणि खालून वर सुरू आहे, प्रत्येक टप्प्यावर फाईल पुढे सरकण्या साठी आंदोलन करायचे का असा संतप्त सवाल जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे यांनी केला आहे

सरकारचे सोयीस्करपणे दुर्लक्ष

२० जानेवारी २०१४ रोजी जलविज्ञान संस्थेचे या प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष घनफुट (१८४० सहस्त्र घन मिटर) क्षमतेचे प्रमाण पत्र मिळाले आहे , सविस्तर प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता मिळून राज्य शासनाची १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३ रुपयांची प्रशासकीय मान्यता दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी मिळाली आहे. मात्र नुसती निविदा प्रक्रिया राबविण्यात २ वर्ष लागली , दरम्यानच्या काळात समुद्धी महामार्गासारखे महाकाय प्रकल्प पूर्ण होतात , त्यांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी मिळतात ,शेतकऱ्यांची मागणी असलेल्या विषयांवर मात्र सरकार सोयीस्करपणे दुर्लक्ष करते.

येवला तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प

या प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील प्रत्यक्ष ३५८ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु. रेंडाळे या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे. कायमच अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. हा राज्यस्तरीय प्रकल्प असून आजवर २०१२ नंतरच्या सर्व जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषी, वने, पर्यावरण या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातून हा विषय गेला आहे. यापुढेही या विविध खात्यांचा संयुक्त समन्वय साधून प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो . मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे .

असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प :-

एकुण खर्च मान्यता १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३
लाभार्थी गावे :- राहाडी खरवंडी , देवदरी
सिंचन क्षमता : – ३५८ हेकटर
उपलब्ध होणारे पाणी : – ६५.३३ दश लक्ष घनफुट
धरणाची लांबी : – २२५ मीटर
धरणाची उंची : – १६. १८ मीटर
सांडव्याची लांबी : – ९० मी
बुडीत क्षेत्र : – ५७ हेक्टर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -