अतिअवजड वाहतुकीमुळे होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने निर्णय
मुरूड : मुरूड – अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या पुलावरून पाच टन वजनावरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातली होती. मात्र आता महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू नये, याकरता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी गुरुवार ८ जूनपासून तीन दिवसांसाठी पूल बंद असणार आहे.
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावानुसार रेवदंडा – साळाव पुलावरून होणाऱ्या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच पुलाची पुनर्बांधणी व लोड टेस्टिंगचे काम करण्यासाठी रेवदंडा- साळाव पूल पुढील २० दिवसांसाठी बंद राहील. पुलावरून ५ टन वजनावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहेत. मात्र लोड टेस्टिंगच्या कामामुळे सर्व प्रकारची वाहतूक ८ ते १० जून या तीन दिवसांदरम्यान बंद करण्यात आली आहे.
अलिबाग ते साळाव दरम्यान होणा-या अवजड वाहनाच्या वाहतुकीसाठी अलिबाग -पोयनाड – वडखळ – नागोठणे – कोलाड – साळाव असा पर्यायी मार्ग आहे. तसेच दुसरा पर्यायी मार्ग अलिबाग – बेलकडे – वावे – सुडकोली – रोहा – तळेखार – साळावमार्गे आहे. मुरूड – अलिबाग दरम्यान होणारी अवजड वाहतूकीसाठी मुरूड – साळाव – तळेखार -चणेरा – रोहा – कोलाड – नागोठणे – वडखळ – पोयनाड – अलिबाग या पर्यायी मार्गाचा वापर होऊ शकतो.