हवामान विभागाचा सावधगिरीचा इशारा
पुणे : मान्सूनचे आगमन लांबले आहे. त्यातच अरबी समुद्रातील चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
याबाबत हवामान विभागाने अद्याप अलर्ट जारी केला नसला तरी कोकण किनारपट्टीवरील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन केले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हे परिपत्रक काल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
दरम्यान, या संदर्भात हवामान विभागाचे मुंबईचे अधिकारी सुनील कांबळे म्हणाले की, काही मॉडेलनुसार चक्रीवादळाची शक्यता वर्तवली जात असली तरी भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिलेला नाही. चक्रीय वात स्थितीनंतर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईपर्यंत पुढील स्थितीबद्दल सांगितले जात नाही, असेही ते म्हणाले.
तर पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामान अंदाजासाठी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या मॉडेलमध्ये चक्रीवादळाबद्दल एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट केले. हवामान विभागाने ही प्रणाली तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत पोहोचण्याची शक्यताही कमी असल्याचे म्हटले आहे.
मात्र असे असले तरी कमी दाबाचे क्षेत्र या प्रणालीची व्यापकताही मोठी असते. त्यामुळे त्या अनुषंगाने मच्छिमारांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.