रिलायन्स ज्वेल्स शोरुममधून तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास
सांगली : सांगली जिल्ह्यात मिरज येथे मार्केट यार्ड चौकावरील रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये काल दुपारी तीनच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यात दरोडेखोरांनी सोन्याचे व हिर्याचे तब्बल १४ कोटींचे दागिने लंपास केले. हे दरोडेखोर परराज्याचे असल्याची माहिती मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा दरोडा आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दरोडेखोरांची टोळी पकडण्यात अजून यश आलेले नाही. पोलिसांची सात पथके यासाठी तयार करण्यात आली आहेत. इतर जिल्ह्यांतील पोलिसांचीदेखील या कामी मदत घेतली जात आहे.
या घटनेत सुरुवातीला ४ ते ५ जण ग्राहक असल्याचे सांगत रिलायन्स ज्वेल्स शोरुममध्ये गेले. त्यांनी सगळ्या कर्मचार्यांना एकत्रित करुन त्यांचे हातपाय बांधले. मॅनेजरलाही धमकावण्यात आले. त्यातील दोन कर्मचार्यांना दागिने पिशवीत भरण्यास सांगितले. त्यानंतर हे दरोडेखोर शोरुमच्या बाहेर निघताना आत जाणार्या काही ग्राहकांसोबत त्यांची झटापट झाली आणि गोळीबारदेखील झाला. यात एका ग्राहकाने शोरुमच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता तो जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
हे चोरटे दोन गाड्यांमधून पळाल्याचे समजत आहे, त्यामुळे साधारण ८ ते १० जणांची टोळी असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून या घटनेसंदर्भात सविस्तर धागेदोरे हाती लागलेले नसले तरी ही टोळी परराज्यातूनच आलेली असावी असा पोलिसांचा दाट निष्कर्ष आहे.