
ठाकरे गटाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी केलं सुचक वक्तव्य
मुंबई: उबाठा गटाच्या सामना अग्रलेखातून भाजपवर केल्या गेलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सामनाच्या अग्रलेखावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे. तिकडे जेवढी अस्वस्थता आणि असंतुष्टता आहे, ती तीन-चार लोकांमुळे आहे. त्या संदर्भात मी बोलण्याऐवजी तुम्हाला भविष्यात कळेल, असा सूचक टोलाच फडणवीस यांनी लगावला. दुसरीकडे, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांना माहिती आहे की पोपट मेला आहे. पण त्यांच्या कार्यकर्त्यांना निराश वाटू नये म्हणून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. पण अशा प्रकारच्या वक्तव्यांनी न्यायालयाचा कुठलाही निर्णय बदलत नसतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ठाकरे गट वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल. तर त्याबद्दल काय बोलणार, असे फडणवीस म्हणाले.