Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीनव्या संसद भवनातील राजदंड ठरणार इतिहासाचा साक्षीदार

नव्या संसद भवनातील राजदंड ठरणार इतिहासाचा साक्षीदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या दिवशी होणार उद्घाटन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारताच्या नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या दिवशी २८ मे रोजी उद्घाटन होणार असून सत्ता आणि न्यायाचे प्रतीक असलेल्या एका ऐतिहासिक वस्तूंचा उल्लेख केला जाणार आहे. ७५ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा धागा जोडलेला असून तो राजदंडाच्या संबंधित आहे. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हाती राजदंड सोपवला अन् भारतीयांनी मोकळा श्वास घेतला. या राजदंडाबद्दल आता सांगण्याचं कारण म्हणजे नव्या संसद भवनात खास राजदंड बसवला जाणार आहे. यासंदर्भात इतिहासवजा माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितली.

अमित शहा म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात निश्चित केलेल्या उद्दिष्टांपैकी आपल्या ऐतिहासिक परंपरांचा आदर करणे आणि त्यांचे पुनर्जागरण हे एक ध्येय होते.’ राजदंडाशी संबंधित गोष्ट सांगताना शहा पुढे म्हणाले की, ही घटना स्वातंत्र्याच्या क्षणाशी संबंधित आहे. ‘१४ ऑगस्ट १९४७च्या रात्री एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना घडली. आज ७५ वर्षांनंतरही देशातील बहुतांश नागरिकांना याची माहिती नाही. राजदंडाने आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हा राजदंड ब्रिटिशांकडून भारतीयांना सत्ता सुपूर्द केल्याचे प्रतीक आहे.
शहांनी हाच धागा धरून पुढे सांगितले की, ‘या घटनेचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतल्यानंतर तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल की, ही माहिती आजपर्यंत देशासमोर का आली नाही? यानंतर हा गौरव सोहळा देशासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’

तामिळनाडूतून आला होता राजदंड
राजदंडांची गोष्ट सांगताना शहा म्हणाले, ‘१४ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यक्रमाला राजेंद्र प्रसाद देखील उपस्थित होते, जे देशाचे पहिले राष्ट्रपती बनलेले. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय झाला तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉर्ड माऊंटबॅटन यांना भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पाठवण्यात आले होते. माऊंटबॅटन यांना भारतीय संस्कृती आणि चालीरीतींची माहिती नव्हती, म्हणून त्यांनी नेहरूंना विचारले की, सत्ता हस्तांतरणासाठी कोणता समारंभ आयोजित करावा. नेहरूंना प्रश्न पडला. त्यांनी थोडा वेळ मागून घेतला. जवाहरलाल नेहरूंनी त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय संस्कृतीचे अभ्यासक सी. राजगोपालाचारी यांना या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले.’ ‘यासाठी सी. राजगोपालाचारी यांनी अनेक पुस्तके वाचली, ऐतिहासिक परंपरा जाणून घेतल्या आणि समजून घेतल्या. त्यांनी अनेक राज्यांच्या कथा वाचल्या आणि राजदंडच्या माध्यमातून सत्तांतराच्या प्रक्रियेची माहिती घेतली. त्यांनी नेहरूंना सांगितले की, भारतात राजदंडाद्वारे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया अधिकृत करण्यात आलेली आहे. पंडित नेहरूंनी तामिळनाडूतील विद्वानांकडून राजदंड स्वीकारून सत्ता हस्तांतरण पूर्ण केले”, असं शहा यांनी सांगितले. ‘हा विधी पूर्ण करण्यासाठी पंडित नेहरूंनी दक्षिणेतील मठाधिपतींना बोलावले होते. कारण त्यांना भारताची आध्यात्मिक एकता आणि एकात्मता हवी होती. सेन्गोल हा शब्द तमिळ शब्द सेम्माई या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ नैतिकता आहे. हे सेंगोल विद्वानांनी पूजलेलं आहे आणि गंगेच्या पाण्याने पवित्र केले गेले आहे. त्यावर पवित्र नंदी विराजमान आहे. सेंगोलची ही परंपरा ८ व्या शतकापासून चौल साम्राज्याच्या काळापासून आहे, असेही शाह यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -