पालघर (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यात दोन मोठे, चार मध्यम आणि सहा लघु पाटबंधारे प्रकल्प असून, त्यामध्ये मिळून ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील ६० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध असल्यामुळे वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याची वेळ प्राधिकरण आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे.
पालघर, डहाणू, वसई या तालुक्यांतील सिंचनासाठी, नागरी भागात पुरवण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्राला पुरविण्यात येणाऱ्या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाच्या २७६.३५ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ९४.३०९ दघमी म्हणजे ३४.१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी ९८.७६५ म्हणजेच ३५.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर कवडास बंधाऱ्यातून ९.९६ दघमी उपयुक्त साठ्यापैकी ८.३६० दघमी म्हणजेच ८३.९४ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षी ९.८१० दघमी म्हणजेच ९८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.