पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या मनात काहीतरी भयंकर दडले होते. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahemdabad Expressway Accident) डहाणू (Dahanu) तालुक्यातील धानिवरी (Dhanivari) येथे एका मालवाहू ट्रकला झालेल्या भीषण अपघातात तब्बल १३ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक वऱ्हाड्यांना घेऊन जाणाऱ्या या ट्रकला एका महाकाय कंटेनरने जोरदार धडक दिली. एका क्षणातच लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आणि बापूगाव परिसरातील लाखनपाड्यावर कधीही न भरून निघणारा दुःखाचा डोंगर कोसळला.
शॉर्टकटच्या नादात गेला १३ निष्पापांचा जीव
नेमका अपघात कसा झाला, हे ऐकल्यावर अंगावर काटा येतो. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ४ वाजता बापूगाव येथून हा 'आयशर' ट्रक खडकीपाडा येथे साखरपुड्यासाठी निघाला होता. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त, म्हणजेच १०० हून अधिक लोक दाटीवाटीने बसले होते. प्रवासादरम्यान, धानिवरी येथील 'हॉटेल तुळशी'जवळून कायदेशीर यू-टर्न (U-Turn) घेऊन वळसा घालण्याऐवजी, चालकाने वेळ वाचवण्यासाठी पुलाखालून राँग साईडने म्हणजे चुकीच्या दिशेने गाडी नेण्याचा जीवघेणा निर्णय घेतला. नवरीचे घर अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर आलेले असतानाच, समोरून भरधाव वेगात येणारा एक कंटेनर दुभाजकावर चढला आणि थेट या वऱ्हाडाच्या ट्रकवर आदळला. हसत-खेळत गप्पा मारत निघालेल्या वऱ्हाड्यांवर एका क्षणात मृत्यूने झडप घातली.
६ लाख ५० हजार कोटींची गुंतवणूक; १ लाख २३ हजार ५०० नोकऱ्या उपलब्ध होणार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासोबतच ...
या दुर्घटनेनंतर संपूर्ण लाखनपाडा (बापूगाव) परिसरात अक्षरशः स्मशानशांतता पसरली आहे. अपघातात प्राण गमावलेल्या १३ पैकी १२ जणांवर आज गावात एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी अत्यंत शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच रांगेत ठेवलेले १२ मृतदेह पाहून उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. घरातील कर्ते, महिला आणि लहान मुले गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आपल्या आप्तेष्टांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गावानेच स्मशानभूमीत गर्दी केली होती.
शासनाची धाव आणि जखमींना मदतीचा हात
या भीषण घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासह खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, विलास तरे, विनोद निकोले आणि हरिश्चंद्र भोये यांनी अंत्यविधीला हजेरी लावत कुटुंबीयांचे सांत्वन केले. सध्या डहाणूच्या धुंदलवाडी येथील 'वेदांता रुग्णालयात' १७ गंभीर जखमींवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत तातडीची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींच्या उपचारांची कोणतीही हेळसांड होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागाने त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. नातेवाईकांना रुग्णालयात ये-जा करण्यासाठी आणि राहण्यासाठी सर्व व्यवस्था शासनातर्फे केली जाईल, असे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिले आहे.
अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्यांची नावे :
- सुरेश रत्ना लाखात
- पांडू गणपत लाखात
- काळू गोविंद लाखात
- सुनील अर्जुन दांडेकर
- चिमा गोविंद कुरहाडा
- नमिता विठ्ठल दांडेकर
- सारिका संतोष लाखात
- आयुष सिताराम लाखात
- सागर नामदेव शेंडे
- वंदना शिवराम वळवी
- सलोनी शिवराम वळवी
- अजय अहाडी
- रियांशी संतोष लाखात





