रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ६ मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी मनसे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सतीश नारकर यांनी कै. प्रमोद महाजन क्रीडांगणाची पाहणी केली.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणातील ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे. सभेला कोकणातील पाचही जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. हे लक्षात घेऊन सभेपूर्वीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी नारकर हे रत्नागिरीत आले होते. स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली. सभेचे स्टेज, सभेला येणाऱ्यांची बैठक व्यवस्था यासह वाहनांचे पार्किंग अशा गोष्टींबाबत नारकर यांनी कार्यकर्त्यांना सूचनाही दिल्या आहेत.
महावितरणपासून ते आरटीओपर्यंतकडून मिळणाऱ्या सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत, असे नारकर यांनी सांगितले.